संत तुकडोजी महाराज

सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.


भजन ३१ ते ३५

भजन - ३१

चला गडे हो ! चला पंढरी, भाव धरुनिया मनी ।

विठोबा भेट देइ धावुनी ॥धृ॥

पुंडलिकाने करुनि कमाई, देव आणिला जगी ।

पहाया चला घेउनी सगी ॥

संसाराच्या सरोवरी ते, सौख्य न मिळते कुणा ।

विचारा विचारा करुनी मना ॥

(अंतरा)

मनपणा सोडुनी हो उनिया मोकळे ।

देहभाव सगळा ओसंडावा बळे ।

मग रूप पहावे विटेवरी सावळे ।

आनंदाची नुरते सीमा, पहा पहा पर्वणी ।

निघा हो निघा अहंतेतुनी ॥१॥

वाटे भू-वैकुंठ उतरले, चंद्रभागेच्या तिरी ।

न दुसरे स्थान असे भूवरी ॥

सुकृत ज्यांचे उदया येई, ते जन वारी करी ।

विसरती भव-भय दुरच्या दुरी ॥

चहु मार्गांनी 'विठ्ठल विठ्ठल' ध्वनी उठे अंबरी ।

वाटतो प्रेमभाव अंतरी ॥

(अंतरा)

कडिकोट किले मजबूत बांधल्या गढ्या ।

निर्भये भक्तजन मार्गि घालत उड्या ।

नाचती लोळती घेउनिया सोंगड्या ।

काळ जाइना फुका, लाजतो यम पाहुनि दूरूनी ।

भक्ति जे करिती हृदयातुनी ॥२॥

आषाढी-कार्तिकीस येती, अफाट जन भक्तिने ।

रंगती हरुनि भेद उन्मने॥

दिंडी-पताका, मृदुंग-वीणे, असंख्यसे वाजती ।

कुंठते कर्णि ऎकता मती ॥

धो धो कर्णे, टाळ-झांजरी, आणिक वाद्ये किती ।

गर्जती भक्त मुखे अगणिती ॥

(अंतरा)

"पुंडलीक वरदा हरि विठ्ठल" ऎकता ।

ती अफाट सेना डोळ्याने पाहता ।

पालख्या पादुका क्षणही सहवासिता ।

देहभाव हरतसे, काय मी सांगु पुढे काहणी ?

पहा रे ! पहा एकदा कुणी ॥३॥

करुनि कृपा श्रीज्ञानदेव बोलले ग्रंथिच्या खुणा ।

जयांनी तुटति जीव-यातना ॥

सुलभ व्हावया मार्ग तुकोबा अभंग वदती जना ।

अभंगी लागे मन चिंतना ॥

एकनाथ एक नाथ आमुचा उदार होउनि मना ।

प्रगटवी गुप्त-गुह्य भावना ॥

(अंतरा)

वसविली अशी ही पावन-भू भूवरी ।

सुख संतांचे माहेर खरी पंढरी ।

मी बघता झालो देहिच वेड्यापरी ।

तुकड्यादास म्हणे नरदेही घ्या सार्थक करवुनी ।

वेळ ही दवडु नका हो कुणी ॥४॥


भजन - ३२

अशुध्द शेतीवरी पिकेना सुंदर फल रे गड्या ! ।

शुध्द कर मृतिका नरबापुड्या ! ॥धृ॥

वर-वर घेउनि पिके, बुडविले शेत कसे त्वा अरे ? ।

अता का घेशि कर्म-नांव रे ? ॥

वाढविले शेतात वृक्ष बहु, काम जयांचे नसे ।

उडविले पैसे, खाली खिसे ॥

पूर्वपुण्य तव उदय पावुनी शेत मिळाले बरे ।

हरे जरि करशिल सुखहाव रे ! ॥

(अंतरा)

श्रीमंत संत तो धनी जगी धरवरी ।

जा शरण तयाला चरण धरी वरवरी ।

घे मत त्याचे मग शेत पिके भरपुरी ।

विवेकशस्त्रा घेउनि हाती, वृक्ष तोडि शुर गड्या ! ।

शुध्द कर मृतिका नरबापुड्या ! ॥१॥

धर नांगर, ज्ञानाग्नि चक्षुने जाळि अज्ञ-वृक्षया ।

पालवी-खोड मुळासह तया ।

बैल कामक्रोधादि जुंपुनी, माया-जू धर वरी ।

साफ कर देह-शेत अंतरी ॥

असत्य दिसते सत्य जये, ते फेकि विषय बाहिरी ।

फळे मग ब्रह्म पीक भूवरी ।

(अंतरा)

हो धन्य सुखे खाउनी फळे निर्मल ।

फलरूप दिसे मग शेत कुणी पाहिल ।

पाहुनि करी जग तुझेचि हे राहिल ।

ब्रह्मफलाच्या रुपे दिसे तनु-शेती चांगुल गड्या ! ।

शुध्द कर मृतिका नरबापुड्या ! ॥२॥

देह-शेत हे अशुध्द जाणुनि, शुध्द करी रे ! तया ।

धरी सत्संग स्वच्छ व्हावया ॥

पुण्यपिके ही संस्कारे तू शेतीवरि कमविली ।

नष्ट कर्मात स्पष्ट गमविली ॥

विषय वृक्ष हे पाच जाण रे ! कुबुध्दि-जलि वाढले ।

शस्त्र लावुनि न ते काढले ॥

(अंतरा)

शेतिने बध्दपण आले गा ! तुजवरी ।

मारिती श्रृंग कामादि बैल गुरगुरी ।

होउनी स्वार तुजवरी दिली नोकरी ।

घेइ तुती श्रीगुरुनामाची, मारि तयासी गड्या !

शरण तो मग येईल तुकड्या ॥३॥

भजन - ३३

विरह न साहे सख्या ! तुझा हा, भेट एकदा तरी ।

पाहु दे मूर्ति स्वरुप-गोजिरी ॥धृ॥

व्याकुळ हे जिव-प्राण आमुचे, घ्याया तव दर्शना ।

येउ दे दया जरा तरि मना ॥

अगम्य महिमा तुझी वर्णिली, पूर्ण करी कामना ।

भेट रे ! भेट पतितपावना ! ॥

(अंतरा)

फेक हा मोहमायापट जडभूमिचा ।

मालवी घनांधःकार भेद उर्मिचा ।

झळकवी दिवा झळझळीत ज्ञानाग्निचा ।

जीवभाव हा निरसुनि माझा, अंतःकरण मंदिरी ।

पाहु दे मूर्ति स्वरुप-गोजिरी ॥१॥

सप्तचक्ररत्नांकित ज्याच्या भ्रमती दारावरी ।

वायु अजपाजप अक्षय करी ॥

वृत्ति-अंकुरी ज्ञानवृक्ष हा खुलवुनि पल्लव-फुला ।

तुझ्या दर्शना धाव घे भला ॥

(अंतरा)

नच वेळ करी तू हरी ! भेट एकदा ।

ना कधी तुला मग विसरिन मी सर्वदा ।

इच्छा पुरविच ही, दावि आपुल्या पदा ।

तुकड्यादासा तुजविण हे जग, फोल दिसे भूवरी ।

पाहु दे मूर्ति स्वरुप-गोजिरी ॥२॥

भजन - ३४

हरिभजनाची रुची जयाच्या हृदय-कमली लागली ।

तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥धृ॥

अभ्यासाने वाढत वाढत अंतरंगि पोहोचली ।

नशा अलमस्त उरी दाटली ॥

काय करावे, काय त्यजावे, बुध्दि हे विसरली ।

फकिरी शरिरावर धावली ॥

(अंतरा)

बेतुफान लाटा चढती नयनावरी ।

कुणि द्या अंजनही ना उतरे बाहिरी ।

करि गुंग धुंद, डुलविते शरीरा पुरी ।

मन-वृत्ती ही वेडिच झाली, हरिच्या पदि लागली ।

तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥१॥

इंद्रिय-वृत्त्या भोगावाचुनि, तृप्त होत चालल्या ।

प्रवाही वाहति सुखाच्या खुल्या ॥

असो नसो कपडा अंगावरि चिंध्या अति शोभल्या ।

जरीला लाजविती चांगुल्या ॥

बिन कवडीची कंबर कैसी उदात्तशी शोभली ।

अधिक श्रीमंतीहुनि वाढली ॥

(अंतरा)

नच बास घरी पण बादशाहि भेटली ।

चौखूट जहागिरि विश्वाची लाधली ।

प्रतिबंध-बंधने सगळी झाली खुली ।

स्वतंत्रतेची गढी मिळाली, अमरबुटी लाधली ।

तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥२॥

शास्त्र-पुराणे-वेदादिक हे, सुत्र बोलु लागले ।

वाचल्याविण उभे जाहले ॥

सृष्टि सुखाची सुंदर शोभा त्या भवती शोभली ।

जनांची जीव-वेली गुंफली ॥

अखिल जनाची मोहिनी माया खूष तयावर भली ।

मागण्या आज्ञा उभि जाहली ॥

(अंतरा)

ही अमरबुटी पावली 'हरी' बोलता ।

विसरली भेदवृत्ती विषयांची लता ।

किति गोड वाटते अनुभव हा पाहता ।

तुकड्यादास म्हणे जिववृत्ती शीवरूप पावली ।

तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥३॥

भजन - ३५

पंढरपुरच्या बादशहाचे सज्ज शिपाईगडी ।

निघाले दरबारी तातडी ॥धृ॥

बादशहाचे हुकुम पावता पेश व्हावया पुढी ।

घालती निर्भयमार्गी उडी ॥

आर्त होउनी निघती वाटे, भेटाया धडपडी ।

अंतरी बाहेरी आवडी ॥

(अंतरा)

घरकाम कशाचे ? काहि सुचेना तया ।

चढविती आपुल्या निर्मळ पोषाखिया ।

खांदि पताका झळकत भगव्या, जाति मिळुनि सोंगडी ।

निघाले दरबारी तातडी ॥१॥

अफाट सैनिक जमले मार्गी शस्त्र घेउनी भले ।

टाळ आणि मृदंग, तंबुरि खुले ॥

'विठ्ठल' नामे करित गर्जना अंतरंगि रंगले ।

नाचती घडि घडि सुख चांगले ॥

धो-धो वाद्यहि रणवाद्यासम समरांगणि गर्जले ।

विठुचे सैनिक येती खुले ॥

(अंतरा)

पालख्या-पताका घड्या-चौघड्या किती ।

कोंदला नाद बहु, टाळ-वाद्य अगणिती ।

भेरिया नगारे मृदंगही वाजती ।

असंख्य गर्दी, अपुर्व शोभा, धन्य धन्य ती घडी ।

निघाले दरबारी तातडी ॥२॥

गजबजली चौफेर पंढरी, सैन्यभार लोटला ।

ध्वनी-प्रतीध्वनी एक ऊठला ॥

मस्त हत्तिसम थै-थै नाचत सैनिक येती पुढे ।

'जय जय ज्ञानदेव' कडकडे ॥

'ज्ञानदेव सोपान निवृत्ती मुक्ताई' चे धडे ।

गर्जती 'तुकाराम' चौघडे ॥

(अंतरा)

नच रीघ उरे पै-पाय मुंगि जावया ।

जन असंख्य येती सैनिक हे पहावया ।

दणदणे विठूचे महाद्वार नादि या ।

वाटे की वैकुंठ उतरले मृत्युलोकिच्या थडी ।

निघाले दरबारी तातडी ॥३॥

पंढरपुरचे निर्मळ दैवत आहे आमुच्या घरी ।

वाडविलास त्याचि चाकरी ॥

आजे-पणजे वारिच करिता पंढरीस अर्पिले ।

विठूच्या दरबारी ठेविले ॥

खांदि पताका, हाति टाळ आणि गळा माळ तुळशिची ।

मुखी नामावलि पंढरिची ॥

(अंतरा)

भाग्याचे आम्हा पंढरपुर भेटले ।

आषाढिस जाता हे सोहळे पाहिले ।

मन उन्मत्त झाले मस्त डोलु लागले ।

तुकड्यादास म्हणे साधा तरि, एकवेळ ती घडी ।

निघाले दरबारी तातडी ॥४॥