गजानन महाराज

गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते.


दांभिकतेचा तिरस्कार

गजानन महाराज हे ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते. परंतु दांभिकतेचा मात्र त्यांना खरोखरच फार तिरस्कार होता. विठोबा घाटोळ नावाच्या त्यांच्या सेवेकऱ्याने जेव्हा महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे, अंगात आल्याचे नाटक करून फसविणे असे प्रकार सुरू केले तेव्हा महाराजांनी त्याला धरून काठीने चांगलेच बदडून काढले, जेणेकरून त्याने मठ कायमचाच सोडून् दिला. अखेर सदगुरूचे पाय लाभून देखील त्याच्या दुर्दैवाने दूर झाले. असेच लाडकारंज्याचा लक्ष्मण घुडे ह्यास गजानन महाराजांनी पोटदुखीच्या मरणप्राय वेदनांपासून मुक्त केल्यानंतर त्याने श्रींना स्वतःच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले; तेथे जरी त्याने श्रींचे उत्तमपणे स्वागत केले तरी "सारी संपत्ती आपलीच आहे, मी देणारा कोण?" असे म्हणत असताच ताटात काही रुपयेदेखील ठेवले होते; त्याचे हे दांभिकपणाचे वागणे महाराजांना मुळीच आवडले नाही. त्यावेळी त्याची परीक्षा पहाण्याकरिता गजानन महाराजांना त्यास "तिजोरीचे दरवाजे फेकून दे!" असे म्हणताच घुडे चमकला आणि त्याला खूप आग्रह केल्यानंतर त्याने तिजोरीचा दरवाजा उघडला आणि स्वतःच त्याच्या उंबरठ्यावर जाऊन बसला आणि महाराजांना म्हणाला, "महाराज यावे | वाटेल ते घेऊन जावे ||" तेव्हा त्याचे ते दांभिक वर्तन पाहून महाराज तिथून उपाशी निघाले व म्हणाले, "माझे माझे म्हणशी भले | भोग आता त्याची फळे ||". श्री महाराज म्हणाले, "मी येथे येऊन तुला दुप्पट धनसंपत्ती देणार होतो, परंतु ते तुझ्या प्रारब्धात नाही." असे म्हणून श्री गजानन महाराज तिथून निघून गेले. त्यानंतर सहा महिन्यात लक्ष्मण घुडे कंगाल झाला आणि त्याच्यावर भीक मागण्याची पाळी आली.