श्रीगणेशाची सहस्त्र नामे

श्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ.


श्लोक १५१ ते १५५

दशात्मक: दशभुज: दश-दिक्‌पति-वन्दित: ।
दश-अध्याय: दशप्राण: दशेन्द्रिय-नियामक: ॥१५१॥
९१९) दशात्मक---दशदिशात व्यापक. दशदिशास्वरूप.
९२०) दशभुज---दहा भुजा असणारा. (कृतयुग अवतार)
९२१) दशदिक्‌पतिवन्दित---पूर्व दिशेचा पति (स्वामी) इन्द्र, आग्नेयीचा अग्नी, दक्षिणेचा यम, नैऋत्येचा निऋति, पश्चिमेचा वरुण, वायव्येचा वाय़ू, उत्तरेचा सोम, ईशान्येचा ईश्वर, ऊर्ध्व दिशेचा ब्रह्मा, अधो दिशेचा अनन्त अशा दहा दिशांच्या स्वामींना वन्दनीय असणारा.
९२२) दशाध्याय---ऋग्वेद-यजुर्वेद-सामवेद-अथर्ववेद हे चार वेद व त्यांची षडंगे शिक्षा-कल्प-व्याकरण-छन्द-ज्योतिष आणि निरुक्त यांचा अध्येता.
९२३) दशप्राण---प्राण-अपान-व्यान-समान-उदान हे पंचप्राण व नाग-कूर्म-कृकल-देवदत्त आणि धनंजय हे उपप्राण-स्वरूप असणारा.
९२४) दशेन्द्रियनियामक---कान-नाक-डोळे-जीभ-त्वचा ही पंचज्ञानेन्द्रिये व हात-पाय-वाणी-पायु आणि उपस्थ ही पंचकर्मेन्द्रिये यांच्यावर नियंत्रण ठेवणारा.
दशाक्षरमहामन्त्र: दश-आशा-व्यापि-विग्रह: ।
एकादश-आदिभि:-रुद्रै:-स्तुत: एकादशाक्षर: ॥१५२॥
९२५) दशाक्षरमहामन्त्र---‘ॐ हस्तिपिशाचिनी हुं स्वाहा ।’ हा दशाक्षरमहामन्त्र, या मन्त्राची देवता हस्तिपिशाचिनी असून तिचा ईश श्रीगणेश आहे. हा दशाक्षरमहामन्त्रस्वरूप असणारा.
९२६) दशाशाव्यापिविग्रह---दश आशा म्हणजे द्श दिशा व्यापून उरणारा ज्याचा विग्रह म्हणजे देह आहे असा.
९२७) एकादशादिभीरुद्रै:स्तुत :--­- अकार रुद्र म्हणजेच कपाली, पिङ्गल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, अजैकपात्‌, अहिर्बुध्न्य, शम्भू, चण्ड आणि भग हे ज्यांमध्ये प्रमुख आहेत अशा रुद्रांकडून प्रशंसिला गेलेला.
९२८) एकादशाक्षर---अकरा अक्षरी मन्त्रस्वरूप.
द्वादश-उद्दण्ड-दो:-दण्ड:, द्वादशान्त-निकेतन:।
त्रयोदशभिदा-भिन्न-विश्वेदेव-अधिदैवतम्‌ ॥१५३॥
९२९) द्वादशोद्दण्डदोर्दण्ड---दो: म्हणजे बाहू. बारा उद्दंड बाहुभुजांनी युक्त.
९३०) द्वादशान्तनिकेतन---ललाटापासून वर ब्रह्मरंध्रापर्यंतचे स्थानास ‘द्वादशान्तं’ असे म्हणतात. तेथे निवास करणारा.
९३१) त्रयोदशभिदाभिन्नविश्वेदेवाधिदैवतम्‌---तेरा भेदांनी भिन्न झालेल्या विश्वेदेवांची (वसु, सत्य, क्रतु. दक्ष, कालकाम, धृति, कुरू, पुरूरवा, माद्रय, कुरज, मनुजा, रोचिष्मत्‌) अधिदेवता.
चतुर्दश-इन्द्रवरद: चतुर्दश-मनुप्रभु: ।
चतुर्दशादिविद्याढय: चतुर्दशजगत्‌-प्रभु: ॥१५४॥
९३२) चतुर्दशेन्द्रवरद---यज्ञ-विभू-सत्यसेन-हरी-वैकुण्ठ-अजित-वामन-सार्वभौम-ऋषभ-विष्वक्सेन-धर्मसेतू-सुदामा-योगेश्वर आणि बुहद्‌भानु या १४ इन्द्रांना वर देणारा.
९३३) चतुर्दशमनुप्रभु---स्वायंभुव, स्वारोचिष, उत्तममनू, तामसमणू, रैवत, चाक्षुष, वैवस्तव, सावर्णी दक्षसावर्णी, ब्रह्मसावर्णी, धर्मसावर्णी, रुद्रसावर्णी, देवसावर्णी, इंद्रसावर्णी या चौदा मनूंचा स्वामी.
९३४) चतुर्दशादिविद्याढय---४ वेद, ६ वेदांगे, न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र मिळून चोदा मूळ विद्यांनी संपन्न असलेला.
९३५) चतुर्दशजगत्‌प्रभु---भू:भुवादी सप्त ऊर्ध्वलोक आणि अतलवितलादी सप्त पाताल लोक या चौदा भुवनांचा (जगतांचा) स्वामी.
सामपञ्चदश: पञ्चदशी-शीतांशु-निर्मल: ।
षोडश-आधार-निलय: षोडश-स्वर-मातृक: ॥१५५॥
९३६) सामपञ्चदश---पंधरा स्तोममंत्र आणि चार आज्यस्तोत्र हे सामयुक्त होऊन गणपतिस्वरूप होतात म्हणून गणपती या नावाने ते प्रसिद्ध आहेत.
९३७) पञ्चदशीशीतांशुनिर्मल---शीतांशु म्हणजे ज्याचे किरण शीत आहेत असा चन्द्र. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शांत आणि निर्मळ असणारा.
९३८) षोडशआधारनिलय---मानवी शरीरातील जीवनकार्य चालविणारी १६ आधारस्थाने आहेत.
१)पादांगुष्ठाधार २)मूलाधार ३)गुदाधार ४)मेढ्राधार ५)उड्डियानाधार ६)नाभ्याधार ७)हृदयाधार ८)कण्ठाधार ९)घंटिकाधार १०)तत्त्वाधार ११) जिह्वामूलाधार १२)ऊर्ध्वदन्तमूलाधार १३) नासाग्राधार १४) भ्रूमध्याधार १५)ललाटाधार १६)ब्रह्मरंध्राधार या षोडश आधारांचे आश्रयस्थान असणारा.
९३९) षोडश-स्वर-मातृक---षोडशस्वरस्वरूप. नासिकेतून वाहणारा वायू इडा, पिङ्गला व सुषुम्ना अशा तीन नाडयांतून वाहतो व त्यात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही अशी ५ तत्त्वे विशिष्ट क्रम धरून चालतात, याप्रमाणे १५ प्रकारे होणार्‍या वायुसंचारास ‘स्वर’ अशी संज्ञा आहे. या पंधरांचा आधार असणारा श्रीगणेश हा १६ वा आधार आहे.