श्रीगणेशाची सहस्त्र नामे

श्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ.


श्लोक १३ ते १५

कूष्माण्ड-साम-सम्भूति: दुर्जय: धूर्जय: जय: ।
भूपति: भुवनपति: भूतानां पति: अव्यय: ॥१३॥
६०) कूष्माण्डसामसंभूति---कूष्माण्डयागात एक प्रसिद्ध साममन्त्र उच्चारला जातो. जो गणेशाची विभूती आहे. त्यावरून गणपतीचे कूष्माण्डसामसंभूती असे नाव प्रसिद्ध आहे.
६१) दुर्जय---बलवानांकडून, दैत्यांकडून आणि मनानेदेखील जिंकून घेण्यास जो कठीण आहे असा.
६२) धूर्यय---जगच्चक्राची धुरा विनासायास चालविणारा.
६३) जय---जो साक्षात्‌ जयच आहे.
६४) भूपति---भूमीचा पालनकर्ता.
६५) भुवनपति---भू. भुव:, स्व:, मह:, जन:, तप:, सत्यम्‌ हे सात स्वर्ग आणि अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल, पाताल असे सात पाताळ आहेत. या चौदा भुवनांचा पाल,
६६) भूतानांपति---यच्चयावत्‌ समस्त सृष्टीचा, भूतांचा पालनकर्ता.
६७) अव्यय---शाश्वत, अविनाशी, ज्याला व्यय नाही असा.
विश्वकर्ता विश्वमुख: विश्वरूप: निधि: घृणि: ।
कवि: कवीनाम्‌ ऋषभ: ब्रह्मण्य: ब्रह्मणस्पति: ॥१४॥
६८) विश्वकर्ता---विश्व निर्माण करणारा. अनंतकोटी ब्रह्माण्डांचा निर्माता.
६९) विश्वमुख---विश्वाचा आरंभ ज्याच्यापासून होतो तो.
७०) विश्वरूप---संपूर्ण विश्व हेच ज्याचे रूप आहे तो. सर्वप्रपंचरूप असा.
७१) निधि---महापद्‌म, पद्‌म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील आणि खर्व (हे सर्व कुबेराचे खजिने) असा नवनिधिस्वरूप किंवा हय (घोडा), गज, रथ, दुर्ग, धनसंपदा, अग्नी, रत्न, धान्य आणि प्रमदा या भौतिक वैभवाच्या बाबी (नवनिधी) ज्याच्या चरणी लीन असतात असा, किंवा कामधेनू, दिव्यअंजन, सिद्धपादुका, अन्नपूर्णा, कल्पवृक्ष, चिंतामणिरत्न, घुटिका, कलक आणि परीस हा नवनिधी ज्याच्या आधिपत्याखाली असतो असतो असा तो.
७२) घृणि---घृणि: म्हणजे तेजस्वी. स्वयंप्रकाशी.
७३) कवि---सृष्टिरूप काव्याचा रचनाकार. सर्वज्ञ.
७४) कवीनाम्‌ ऋषभ---कवींमध्ये श्रेष्ठ.
७५) ब्रह्मण्य---साक्षात्‌ ब्रह्मतत्त्व. ब्राह्मण, तप, वेदवेदांगे, ब्रह्म इत्यादींशी सद्‌भाव ठेवणारा.
७६) ब्रह्यणस्पति---अन्नब्रह्मापासून चिद्‌ब्रह्मापर्यंत सर्व ब्रह्मांचा स्वामी, पालक किंवा ज्ञानाचा राजा. ब्रह्मणस्पति शब्दाचा अर्थ यास्काचार्यांनी निरुक्त ग्रंथात असा केला आहे की ‘ब्रह्मणांपाता वा पालयिता वा ।’ म्हणजे यावत्सर्व ब्रह्मगणांचा पाता म्हणजे रक्षणकर्ता अतएव स्वेच्छेने त्यांना निर्माण करून त्यांची स्थितिस्थापना करणारा आणि पालयिता म्हणजे त्यांना सत्ता देऊन त्यांच्याकरवी सृष्टयादी कार्ये करविणारा, एवंच रक्षण करविता असा जो कोणी असेल त्याला ‘ब्रह्मणस्पति’ म्हणावे अथर्ववेदातील गणेशतापिनी नामक उपनिषदामध्ये गणेशाला ब्रह्म व ब्रह्मणस्पति अशी संज्ञा दिली गेली आहे. अशा प्रकारचे ब्रह्मणस्पतित्वाचे स्तवन दुसर्‍या कोणाविषयीही झाले नाही. गणेशसूक्ताची देवता ब्रह्मणस्पति हीच मुख्य स्तविली असून गणेश नाम त्याचे विशेषण म्हणून योजले आहे. साक्षादात्मा ब्राह्मणस्पति, एक गणेशच असून तोच प्रत्यक्ष ब्रह्मैश्वर्यसत्ताधारी आहे. त्याला सत्ता देणारा कोणीच नाही.
वेदामध्ये अन्नब्रह्मापासून ते अयोगब्रह्मापर्यंत पुष्कळशी ब्रह्मे वर्णिली आहेत. त्यामध्ये तत्‌-त्वम्‌-असिस्वरूप त्रिपदांचे शोधन साधणारी सहाच ब्रह्मे मुख्य ठरली आहेत. ती अशी - असत्‌ब्रह्म किंवा शक्तिब्रह्म, सद्‌ब्रह्म-सूर्यब्रह्म, समब्रह्म-विष्णुब्रह्म, तुरीयब्रह्म - नेतिब्रह्म किंवा शिवब्रह्म, नैजगब्र्ह्म-गाणेशब्रह्म किंवा संयोगब्रह्म आणि निवृत्तिब्रह्म किंवा अयोगब्रह्म अशा ब्रह्मांना निर्माण करून म्हणजे वेगळेपणाने प्रकाशित करून क्रीडा करणारा. त्यांच्या शांतिपूर्ण स्थितीनेच लभ्य असणारा आणि त्यांच्या ठिकाणी संततात्म-शांतिरूपाने राहणारा पूर्णयोगशांति-महिमा असा जो त्याला ब्रह्मणस्पति म्हणतात.
ज्येष्ठराज: निधिपति: निधिप्रियपतिप्रिय: ।
हिरण्मयपुर-अन्तस्थ: सूर्यमण्डलमध्यग: ॥१५॥
७७) ज्येष्ठराज---ज्येष्ठांमध्येही जेष्ठ किंवा कार्तिकेयाचा ज्येष्ठ बंधु. गजासुर नावाच्या दैत्यांनी विष्णु-शिवादी सर्वांनाच जिंकून धरून आणले व सांगितले की ‘दोन्ही हातांनी दोन्ही कान धरून भूमीवर मस्तक टेकवून नमस्कार करणे’ असा विशेष नमस्कार माझ्या पायांजवळ दररोज करीत जा.’ श्री गजानन म्हणाले - दैत्याने ठरविलेला नमनरूप दंड मला फार प्रिय आहे. तेव्हा कान धरून व मस्तक टेकवून विष्णु-शंकरादी सर्व देवांनी श्रीगजाननचरणी नमन केले. गजानन प्रसन्न झाले. दैत्यांचा नाश झाला. सर्व सुखी झाले. या अवतारात सर्वश्रेष्ठत्व-सर्वपूज्यत्वसूचक ज्येष्ठराजत्वरूप ऐश्वर्य स्पष्ट झाले. असा नमस्कार गणेशावाचून अन्यत्र करावयाचा नसतो. कारण ज्येष्ठराजत्व इतरत्र कोठेही नाही.
संपूर्ण विश्वाचा, विष्णुशिवादी परमेश्वरांचा व सगुण निर्गुणादी समग्र ब्रह्मस्थितीचा निर्माता असल्यामुळे, जो सर्वांचाच मातापिता ठरलेला आहे. उलटपक्षी त्याला मात्र कोणी मातापिता नाही. कारण तो प्रत्यक्ष ब्रह्मरूप अज ठरलेला आहे. म्हणून वेदांनी त्याचेच मात्र स्तवन ज्येष्ठराज नावाने केले आहे.
७८) निधिपति---नवनिधिंचा पालक. (कुबेराचे नऊ खनिने म्हणजे नवनिधी होय. पाहा नाम क्र. ७१)
७९) निधिप्रियपतिप्रिय---वैभवाचे किंवा सर्व निधींचा संरक्षक जो कुबेर तो निधिप्रियपती आणि त्यालाही प्रिय असणारा असा तो.
८०) हिरण्मयपुरान्तस्थ---दहराकाशाच्या (साधकाच्या हृदयाच्या) मध्यभागी हिरण्यपुर विराजमान असते. चिन्मय ब्रह्माचे निवासस्थान. अन्तर्हृदयात विराजमान किंवा सोन्यारूप्याने मढविलेल्या पुरात (नगरात) विराजमान असणारा.
८१) सूर्यमण्डलमध्यग---सूर्यमंडलाचे मध्यभागी स्थित असलेला.