श्रीगणेशाची सहस्त्र नामे

श्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ.


श्लोक १० ते १२

महागणपति: बुद्धिप्रिय: क्षिप्रप्रसादन: ।
रुद्रप्रिय: गणाध्यक्ष उमापुत्र: अघनाशन: ॥१०॥
३७) महागणपति---मोठयामोठया गणसमूहांवर ज्याची सत्ता आहे असा. गणसमूहांचा पालनकर्ता. समस्त जीवांचे रक्षण करणारा. त्रिपुरासुर नावाचा महाबलाढय दैत्य होऊन गेला. त्याने गणेशांच्या वरदानाने समर्थ होऊन त्रैलोक्याचे राज्य जिंकून घेतले. त्याचा नाश शंकरांकडून होणार ही नियती ठरली होती. शंकरांचे आणि त्याचे तुंबळ युद्ध झाले परंतु शंकर पराभूत झाले. कारण शंकरांकडून मंगलचरणांची नियती सांभाळली गेली नाही. पराक्रमाच्या गर्वात गणेशांचे आराधन न करताच शंकर युद्धासाठी गेले आणि पराभूत झाले. झालेली चूक जेव्हा त्यांना देवर्षी नारदांकडून कळली तेव्हा सावध होऊन पश्चात्तापयुक्त अंत:करणाने शंकरांनी श्रीगणेशांचे आराधन केले व परमसमर्थ विजयी होऊन त्यांनी त्रिपुरासुराचा नाश केला. त्यांनी ज्या ठिकाणी गणेशाचे आराधन केले ते रांजणगाव नामक गाणेशक्षेत्र महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध क्षेत्र आहे. त्यांनी त्या ठिकाणी ‘महागणपतीची’ स्थापना केली. हे क्षेत्र पुणे जिल्ह्यात पुणे-नगर मार्गावर पुण्यापासून बेचाळीस कि. मी. वर आहे.
३८) बुद्धिप्रिय---मोक्षबुद्धि ज्याला प्रिय आहे असा.
३९) क्षिप्रप्रसादन---क्षिप्र म्हणजे ताबडतोब, शीघ्र, भक्तावर चटकन प्रसन्न होणारा.
४०) रुद्रप्रिय---रुद्रगणानां प्रिय असणारा.
४१) गणाध्यक्ष---विविध गणांचा अध्यक्ष, संचालक. ज्या ३६ तत्त्वांच्या आधारे विश्वनिर्मिती झाली त्या तत्त्वसमूहाचा पालक. ती तत्त्वे अशी - १.शिव, २.शक्ती, ३.सदाशिव, ४.ईश्वर, ५.शुद्ध विद्या, ६.माया, ७.विद्या (अविद्या), ८.कला, ९.राग, १०.काल, ११.नियती, १२.जीव, १३.प्रकृति, १४.मन, १५.बुद्धी, १६.अहंकार, १७.श्रोत्र, १८.त्वक्‌. १९.चक्षू, २०.जिह्वा, २१.घ्राण, २२.वाक्‌, २३.पाणी (हात), २४.पाद (चरण), २५.पायु (गुदद्वार). २६.उपस्थ (जननेन्द्रिय), २७.शब्द, २८.स्पर्श, २९.रूप, ३०.रस, ३१.गंध, ३२.आकाश, ३३.वायू, ३४.तेज, ३५.जल आणि ३६.पृथ्वी. या बाहेरील ‘परमशिव’ सदतिसावे तत्त्व होय. दार्शनिकांच्या मतानुसार हे विश्व या ३६ तत्त्वांच्या आधारे बनलेले आहे. (शैवसिद्धांत)
४२) उमापुत्र---उमा म्हणजे पार्वती. पार्वतीचा पुत्र.
४३) अघनाशन---‘अघ’ म्हणजे पाप. पापांचा नाश करणारा, किंवा अघन = अल्पस्वल्प. अशन = खाणे. भक्तांनी दिलेल्या अल्पस्वल्प नैवेद्याने तृप्त होणारा.
कुमार-गुरु: ईशानपुत्र: मूषकवाहन: ।
सिद्धिप्रिय: सिद्धिपति: सिद्ध: सिद्धिविनायक: ॥११॥
४४) कुमारगुरु---कुमार म्हणजे कार्तिकेयाचा ज्येष्ठ भ्राता म्हणून कुमारगुरू किंवा सनक-सनंदन-सनातन सनतकुमार ह्या अतिदिव्य ब्रह्मर्षींना आत्मविद्या प्रदान करणारा म्हणून कुमारगुरू.
४५) ईशानपुत्र---ईशान म्हणजे शंकर. शंकरपुत्र.
४६) मूषकवाहन---उंदीर ज्याचे वाहन आहे तो किंवा उंदीर हे काळाचे प्रतीक आहे. काळावर ज्याची सत्ता चालते तो. मायाकरासुर नावाचा दैत्य होता. त्याने सर्वांना जिंकले. तेव्हा त्याच्या नाशासाठी समस्त देवेश्वरादिकांनी मोठे तप करून, प्रार्थना केल्यावरून आणि विशेषत: पाताळ लोकांचा राजा, पृथ्वीला धारण करणारा नागराजा शेष, यानेही पुत्रप्राप्तीसाठी गणेशाचे तप केल्यावरून व वरबद्धतेमुळे त्याच्या पुत्ररूपाने, त्याच्या ध्यानापासून श्रीगणराजप्रभूंनी एक अवतार धारण केला. त्या अवतारातील गणेशाचे नाव ‘मूषकग’ म्हणजेच ‘मूषकवाहन’ असे ठेवले. मूषूक धातू चौर्यकर्माचा वाचक आहे. सर्वांतर्यामी जो सर्वव्यापक आत्मा, सर्वत्र प्राप्त अशा सर्वाधार-सर्वचालक अशा सत्तेच्या प्रत्ययाने कळून येतो. तोच ब्रह्मसत्तांश स्वमहिमास्थित गमनागमनशून्यशा परब्रह्याच्या परब्रह्यात्मगमनादिकाचे साधन ठरले असल्यामुळे तशा अर्थाचे बोधक असे मूषक नाम त्याला देऊन तेच त्या ब्रह्मणस्पति-गणेशाचे वाहन ठरविले गेले. या संज्ञेतील चौर्यकर्माचे सूचकत्व असे की जीवेश्वरांच्या हृदयात राहणारा बुद्धिचालक अंतरात्माच त्यांच्या शुभाशुभ कर्मांना प्रेरक सत्ताधारी ठरलेला आहे. अर्थात्‌ त्यांच्याकडून घडणारी सर्व कृत्ये करवितो तोच. आपण मात्र अलिप्त. पण त्या सर्व कृत्यांचे पूर्ण फल जे सुख त्याचा उपभोग मात्र तो स्वत:च घेतो. मायामोहात गुरफटलेले लोक ते जीवेश्वरादी कोणीही त्याला जाणत नाहीत. हाच विशेषार्थ ‘मूषक’ संज्ञेमध्ये समजावयाचा. मूषक म्हणजे उंदीर. या लौकिक प्राण्याशी गणेशांच्या वाहनाचा काही एक संबंध नाही. मूषकग म्हणजे व्यापक सत्तेच्या निमित्ताने सर्वत्र गमनादी व्यवहार करणारा. असा हा शेषपुत्ररूपी मूषकवाहन अथवा मूषकग अवतार होय.
४७) सिद्धिप्रिय---अणिमा, लघिमा, गरिमा, महिमा प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व या अष्टसिद्धी ज्याला प्राप्त आहेत आणि प्रिय आहेत असा.
४८) सिद्धिपति---अष्टसिद्धींचा पालक. सर्वांच्या ठिकाणी असणारी सर्व प्रकारची ज्ञानसत्ता, एका गणेशाच्याच हाती आहे. त्याच्या बुद्धीचा चालक मात्र दुसरा कोणीच नाही. अर्थात्‌ बुद्धियुक्त होऊन जे कर्म केले जाते त्याचे यथायोग्य फळही तोच देतो. म्हणून सर्व प्रकारची सिद्धि देणारा ‘सिद्धिपति’ तोच आहे.
दंभासुराच्या नाशासाठी ब्रह्मदेवादी परमेश्वरांनी तपश्चरण केल्यावरून ब्रह्मदेवाच्या ध्यानापासून गणेशाने ‘सिद्धिबुद्धिपति’ नावाचा अवतार धारण केला. येथील सिद्धिबुद्धिपति नामाचा अर्थ असा की भुक्तिसिद्धी, मुक्तिसिद्धी किंवा कैवल्यसिद्धी, जे जे काही मिळवावयाचे असते ते सर्व सिद्धीचे स्वरूप आहे. अशा रीतीने त्या सिद्धीचा पती गणेश सर्वस्वाचेच मूळ ठरतो. तसेच बुद्धीचे स्वरूप ज्ञानमय असते. नामरूपात्मक विश्व नानाकारांनी संपन्न असले तरी तद्रूप ज्ञानसत्ता एकाच अखंड स्वरूपाची असते. अशा बुद्धीचा पती गणेश. सारांश, त्याचे साक्षात्‌ परब्रह्मस्वरूपत्वचया ‘सिद्धिबुद्धिपति’ नावावरून जाणावयाचे आहे.
हा समग्र विश्वविलास व ब्रह्मविहारसुद्धा स्वानंदनाथ प्रभूने आपल्या लीलाविलासासाठी निर्मिला आहे. स्वत: तोच मायेच्या आश्रयाने  नानाकार झाला आहे. अर्थात्‌ त्याचे नानाकार सत्तारूप ज्ञानमय असल्यामुळे तो बुद्धीचे स्वरूप ठरले आहे. तेथील भिन्न भिन्न स्वरूपाच्या प्रत्ययाचे भान हे सिद्धीचे स्वरूप आहे. अशा मोहदायिनी सिद्धी व मोहधारिणी बुद्धी या दोन मायांच्या आश्रयाने क्रीडा करणारा त्यांचा पति तो ‘सिद्धिबुद्धिपति’ नावाने वेदांनी स्तविला आहे.
४९) सिद्ध---स्वत:सिद्ध. स्वसंवेद्य परब्रह्म.
५०) सिद्धिविनायक---भक्ताला धर्मार्थकाममोक्षाची, सिद्धींची प्राप्ती करून देणारा. ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचा वर मिळवून विष्णूच्या कानात दडून बसलेले मधु आणि कैटभ हे दैत्य एके दिवशी कानातून बाहेर पडले. साक्षात्‌ वरदात्या ब्रह्मदेवावरच चालून गेले. त्यांनी विष्णूंकडे प्रार्थना केली. विष्णूंशीही त्यांनी युद्ध केले. विष्णूंनाही ते आवरेनात तेव्हा सर्वजण शिवांकडे गेले. युद्धावर जाण्यापूर्वी श्रीगणेशपूजन करावयाचे राहून गेले त्यामुळे विष्णूंना युद्धात यश मिळाले नसल्याचे शिवांनी सांगितले. तेव्हा भगवंतांनी दंडकारण्यातील सिद्धिक्षेत्र ठिकाणी अन्नपाणी वर्ज्य करून तपानुष्ठान केले. ‘गणेशाय नम:’ या षडक्षरी मंत्राचे अनुष्ठान केले. विष्णूंनी मांडलेले सिद्धासन अनेक वर्षे लोटून देखील कधीही भंग पावले नाही. तेव्हा श्रीगणेशांनी संतुष्ट होऊन त्यांना दर्शन दिले. त्यानंतर विष्णूंच्या हातून ठरल्याप्रमाणे मधु-कैटभ दैत्यांचा नाश झाला. गणेशलोकी जाऊन विष्णूंनी श्रीगणेशांचे दर्शन घेतले. यापुढे कुठलाही दैत्य माजला तरी त्याचा वध करण्याची सिद्धी ॐ काराला प्रार्थना करून मागून घेतली. तेथून विष्णू परत सिद्धक्षेत्री आले. तेथे त्यांना स्वयंभू उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती प्रकट झाल्याचे दिसले. होमहवन करून यथाशास्त्र त्यांनी श्रीगणेशांची प्रतिष्ठापना केली व ‘सिद्धिविनायक’ असे त्याचे नामकरण केले.
पुणे-सोलापूर मार्गावर बोरीवेल हे स्टेशन आहे. तेथून अकरा कि. मी. वर सिद्धटेक तथा सिद्धिटेक हे क्षेत्र भीमा नदीच्या काठावर आहे. सिद्धिविनायकाची येथील मूर्ती तीन फूट उंच आणि सव्वादोन फूट रूंद आहे. हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक स्थान आहे.
अविघ्न: तुम्बरु: सिंहवाहन: मोहिनीप्रिय: ।
कटङ्कट: राजपुत्र: शालक: सम्मित: अमित: ॥१२॥
५१) अविघ्न---विघ्ननाशक. विघ्नरहित, ‘अवि’ म्हणजे पशु. माणसातील पशुत्वाचा नाश करणारा.
५२) तुम्बरु---तुंबरु म्हणजे तंबोरा. जसा संगीताला तंबोर्‍याचा आधार तसाच जीवनसंगीतास ज्याचा आधार असा तो. तुंबरु एका गंधर्वाचे नाव आहे म्हणून तुंबरु याचा अर्थ गायक असा येथे घ्यावा.
५३) सिंहवाहन---कृतयुगात कश्यपगृही श्रीविनायक अवतारात ज्याचे वाहन सिंह होते असा तो.
५४) मोहिनीप्रिय---मोहिनी म्हणजे माया. मायाशक्ती ‘आवरण’ आणि ‘विक्षेप’ या दोन रूपात कार्य करते. ‘आवरण’ म्हणजे मायेची अज्ञानाची शक्ती. आवरणामुळे जीव स्वत:ला परमात्म्यापासून वेगळा समजतो. आणि     ‘विक्षेपा’ने त्याला परमात्म्याच्या ठिकाणी जग अस्तित्वात नसताही भासते. (‘विक्षेप’ म्हणजे चित्ताची चंचलता. चित्तक्षोभ.)
सिद्धी जगाला मोहित करते. म्हणून तिला मोहिनी म्हणतात. त्या सिद्धीचा नाथ म्हणून तो मोहिनीप्रिय.
५५) कटङकट---‘कट’ म्हणजे आवरण म्हणजेच अज्ञान. ज्ञान प्रदान करून अज्ञानाचे आवरण दूर करणारा.
५६) राजपुत्र---राजा वरेण्याच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला आलेला किंवा चन्द्रास पुत्रवत्‌ मानणारा.
५७) शालक---‘श’ म्हणजे परमेश्वर. अलक म्हणजे अंश. परमेश्वरी अंश जो इंद्रियातीत आहे. ‘श’ म्हणजे परोक्ष. इंद्रियातीत. ‘अलक’ म्हणजे केस. केस हा शरीराचा अंतिम भाग. ज्याचा अंत, परिसीमा अज्ञात आहे. ज्याला पूर्णत: जाणणे इंद्रियांना अशक्य असे तत्त्व म्हणजे शालक.
५८) सम्मित---अनंतकोटी ब्रह्माण्डांना व्यापूनही दशांगुले उरलेले परमतत्त्व.
५९) अमित---मोजता न येणारा. सर्वव्यापक. लौकिक प्रमाणांना न कळणारा.