आनंदलहरी

' आनंदलहरी ’ या छोट्याशा काव्यात नाथांनी गुरूभक्तीला बद्धता नाही, तो जन्ममरणरहित असतो याचें सुंदर व समर्पक वर्णन केले आहे.


नामदेवांचें उदाहरण

नामया शरण भगवंतासी । भगवंत तरी प्रत्यक्ष त्यासी । हरी शिकवी नामयासी । सदगुरुविण सुखासी न पाविजे ॥१९॥

तेणें मानूनिया वचन । रिघाला सदगुरुसी शरण । रुप पाहावया निर्गुण । पंढरीनाथाचे ॥१२०॥

तेणें खेचरविसा केला गुरु । तेव्हां जाला साक्षात्कारु । तेणें केला ब्रह्मपूर्णपरु । निजसुखाचें घरु पावला ॥२१॥

एक सदगुरुकृपेवीण । न तुटे जिवाचें बंधन । सदभावी जे भाविक जन । तयांसी हें वचन मानलें ॥२२॥

जे या वचनातें मानिती । भावें सदगुरुते वंदिती । त्यांचे घरीं चारी मुक्ती । दास्य करिती अनायासीं ॥२३॥

बहुत बोलोनियां काय । ज्याचे पदरीं पुण्य होय । तोचि सदगुरुसी शरण जाय । मुक्ती लाहे येचि देहीं ॥२४॥

याचि देहीं याच डोळां । भोगिजे मुक्तीचा सोहळा । ऐसा कोणीएक विरळा । तोचि जिव्हाळा स्वरुपाचा ॥२५॥

त्यासी देखिल्या दृष्टीं । मुक्ती लाहिजे उठाउठीं । मा त्यासी पडल्या गांठी । आनंद सृष्टीं न समाये ॥२६॥

तो म्यां देखिला जनार्दन । देखतांच गेला भवभ्रम । सुख जालें अनुपम्य घन । पावलों सदन मोक्षाचें ॥२७॥