गणेश पुराण - उपासना खंड

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


अध्याय ९

श्रीगणेशपुराणमाहात्म्य

 (ओवी)

सूत कथिती मुनी-वृजा । भृगू बैसती ध्यानस्थ ओजा ।

अंतर-दृष्टी बघती सहजा । पूर्व-कर्म भूपाचें ॥१॥

ऋषी सोमकांताप्रती । तव पूर्वपापें पर्वतो मिती ।

भयंकर असोन नाशाप्रती । व्यर्थ उपावो होत वदले ॥

असें वाटतें आतां मशीं । जरी श्रवसी गणेशपुराणासी ।

तरिच नाशतील पाप-राशी । ऐके भूपा एकाग्र ॥३॥

आठशें गणेशनामांनीं । उदक मंत्रिती भृगू-मुनी ।

राजा समीप येऊनी । प्रोक्षिती जलें देह त्याचा ॥४॥

तों काय झाला चमत्कार । अती लघु-पुरुष सत्वर ।

नासिकांतून बाहेर । आला त्वरित भूपाचे ॥५॥

उत्तरोत्तर वाढों लागला । सप्त-तालएव उंच झाला ।

अती कृष्णवर्ण झाला । पापपुरुष असा तो ॥६॥

आरक्त नेत्र दिसती । जिव्हा त्याची लळलळीती ।

भ्यासूर दाढा असती । पाप-पुरुष असा तो ॥७॥

तो पुरुष वदे भृगूस । क्षुधा लागली या समयास ।

आश्रमींच्या पशूंस । भक्षूनी शमवीन ॥८॥

भृगु आज्ञापी त्या पुरुषा । जाई तरी आम्रवृक्षा ।

त्यामधील महदाक्षा । वसोन राहे तेथेंची ॥९॥

क्षुधाशमनार्थ तयाचीं । शुष्क-पर्णे भक्षी साचीं ।

उपद्रवूं नको तेथेंची । आज्ञा होत तोंवरी ॥१०॥

जव तो पाप-पुरुष । त्या वृक्षा करी स्पर्श ।

भस्म झाला कीं तो वृक्ष । इतुकें पातक दुष्कर हें ॥११॥


त्या भस्मराशींत । पाप-पुरुष लपत ।

हें पाहून विस्मित । सोमकांत झाला तेधवां ॥१२॥

(शिखरिणी)

मुनी त्या भूपाला म्हणति बघ हा वृक्ष अवघा ।

जळोनी गेला कीं अससि तव केलें बहु अघा ॥

जरी तूं आतां हें श्रवण करिसी पैं प्रभुकथा ।

तरी त्या पुण्यानें तरु सजिव हो पावन तथा ॥१३॥

वदे राजा त्यांना श्रवन अथवा दर्शन नसे ।

अशा त्या माहात्म्या कवण मज सांगा मुनि कसें ।

वदे भूपा पूर्वी विधिकडुन व्यासें परिशिलें ।

पुढें व्यासें मातें स्वमुखश्रुत केलेंच पहिलें ॥१४॥

तुझी इच्छा झाली जरि कथन हें मीहि तरि करीं ।

तुवां कासारीं त्या प्रथम उभयें मज्जन करीं ॥

अगा शंका सोडीं मन दृढ करीं भूपति सदा ।

तुझ्या व्याधीसाठीं तनमन करीं अर्पण पदां ॥१५॥

(पृथ्वी)

मुनीस वदती पुढें सुत कथा भृगू भूपती ।

भृगू वदती भूपती करुन स्नान ये ज्ञापिती ॥

गणाधिशपुराण हो श्रवण नित्य ही वासना ।

उठून करि मज्जना वसतसे तिथें आसना ॥१६॥

अशा बघुन निश्चया मुनिस ये दया पावले ।

प्रसाद दिधला त्वरें शरिर गोमटें जाहलें ॥

बहू मुदित जाहला परत आश्रमीं आणिलीं ।

तयांस दिधलीं तदा नविन आसनीं स्थापिलीं ॥१७॥

मुनीस विनयें वदे जरि मनीं असे योजिलें ।

तरी सदय होउनी शरिर साजिरें जाहलें ॥

अशी पुनित ती कथा भृगुहि फार वाखाणित ।

असे पदरिं ज्या बहू धवल पुण्य जें साधित ॥१८॥

अशा परम साधका श्रवणिं त्या पडे ह्या कथा ।

अशा पुनित त्या कथा निरसिती जिवांच्या व्यथा ॥

तशा हरिति सप्त-जा-जनन त्या घडे पातका ।

असे कवण ईश्वर-स्वरुप त्या असे साधका ॥१९॥

अशा गणपती स्तवा करुन शेषही भागला ।

तथापि कथिलें असे चरित तेंच व्यासें मला ॥

तसेंच कथितों तुम्हां श्रवण तें करा संप्रती ।

गणेशकथनीं असो दृढ अशी तुम्हां सन्मती ॥२०॥