श्री वेंकटेश विजय

वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.


अध्याय ८ वा

मागील अध्यायात श्री शुकाचार्य आकाशराजाचे पत्र घेऊन श्रीवेंकटेशाकडे निघाले असे वृत्त आले आहे. श्री शुकाचार्य वेंकटगिरीवर येताना श्रीनिवासाने पाहिले. श्रीशुकाचार्यांना त्यांनी वंदन करून क्षेमकुशल विचारले. त्यांनी क्षेमकुशल सांगून राजाचे पत्र त्यास दिले. पत्र वाचून त्यांना आनंद झाला. शुकाचार्यांनी उत्तर मागताच श्रीवेंकटेशाने त्या पत्राखालीच उत्तर लिहिले. 'राजा आपणास आमचा नमस्कार. ऋषींच्याकडून पाठविलेले पत्र मिळाले. आम्हास आनंद जाहला आहे. वैशाख शुद्ध दशमीस आपण मुहुर्त निश्चय केला आहे. विवाहास येऊन कार्यसांग करावे. माझी मुलगी मी आपणास अर्पण केली आहे हा मजकूर समजला. आम्ही आपल्या म्हणण्याचा स्वीकार केला आहे.' असे उत्तर देऊन ते शुकाचार्यांच्या मार्फत पाठवून दिले.

इकडे आकाशराजा पत्रोत्तराची वाट पहातच होता. तोच शुकाचार्य आले व त्यांनी श्री वेंकटेशाचे पत्र राजास दिले. राजास फार आनंद झाला. इतक्यात बकुलाही आपले कार्य करून आली. बकुलेला श्रीनिवासांनी अनेक अलंकार देऊन संतुष्ट केले व तिची स्तुती करून संतुष्ट केले.

नंतर बकुलेने लग्नाचे दिवस जवळ आले, आपली अद्याप काहीच तयारी नाही असे सांगताच श्री नारायणांनी तयारीस आरंभ केला. गरुडाचे स्मरण करताच ते आले. त्यांच्याकडून सर्वांना निमंत्रणाची व्यवस्था करविली. सर्व देवदेवता, उपदेवता, राजेरजवाडे यांनाही निमंत्रणे गेली. योग्यवेळी ब्रह्मदेव, शंकर, विष्णु, देव, गंधर्व, किन्नर वगैरे आकाश मार्गाने येऊ लागले असता आकाश भरून गेले. बकुळा विचारू लागली. 'नारायणा हे काय आहे?' भगवान म्हणाले, ' हे लग्नाचे वर्‍हाड येत आहे.' यात इंद्र, ब्रह्मदेव मुख्य होते. सर्व मंडळी जमली. श्री नारायणास सर्व देव भेटले. त्यांनी त्यांनी वंदन केले. विश्वकर्म्यास बोलावून भगवंतांनी मंडपाची व्यवस्था व सर्वांना राहण्यास जागा उत्तम तयार करवून घेतल्या. त्या जागा उत्तम असून रत्‍नखचित जमिनी व शृंगारलेल्या होत्या. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे स्नान, भोजन, राहणे, झोपणे, बसणे, उठणे इ० व्यवस्था फार सुरेख केली होती. भिंतीवर सर्व देवतांची चित्रे काढली होती. मंडप पाहिला की, सर्व विश्व पाहिल्याचा भास होतसे. समोर बगीचे. त्यात कारंजी. कमळांनी सुशोभित सरोवरे इ० ते स्थान पाहून कोणाचीही तृप्ति होत नसे. अशी व्यवस्था करून विश्वकर्म्याने भगवंतास येऊन वंदन केले. त्यांनी त्याचा सत्कार केला. पुढील अध्यायात याहिपेक्षा सुरस कथा श्रोत्यांनी ऐकावी.

श्रीपद्मावतीवल्लभाय नमः ॥ पंकजोद्भवजनका दीनदयाळा ॥ पद्मानाभा वैकुंठपाळा ॥ पद्मधर मित्रा तुझी लीला ॥ पयोधिवासा बोलवी पुढे ॥१॥

तू षडविकाररहित पूर्ण ॥ तुज नाही आदि मध्य अवसान ॥ सर्वातर्यामी व्यापून सर्वाहूनी वेगळा तू ॥२॥

तुझे गुणवर्णिता उठाउठी ॥ सहस्त्रमुख जाहला हिंपुटी ॥ नेति म्हणोनि शेवटी ॥ शय्या तुझी जाहला ॥३॥

मी मतिमंद मानव पामर ॥ केवि वर्णू गुणसमुद्र ॥ जन्म सार्थक व्हावा साचार ॥ म्हणोनि वर्णन आरंभिले ॥४॥

गंगा न प्राशवे म्हणोन ॥ उगाचि न बैसवे तृषार्त्याने ॥ क्षीरसिंधु नव्हे शोषण ॥ म्हणोनि क्षुधार्थी न बैसे ॥५॥

तैसे यथामती करोन ॥ वर्णावे हरीचे गुण ॥ म्हणोन आरंभिले लेखन ॥ श्रीवेंकटेश विजयाते ॥६॥

जय मायाचक्र चाळका ॥ कर्माध्यक्षा कर्ममोचका ॥ निर्विकल्पवृक्षा विश्वव्यापका ॥ दीनरक्षका जगत्पते ॥७॥

अनंतब्रह्मांडाचा नायक ॥ तुज नसे दुसरा नायक ॥ वेंकटेशविजय कौतुक ॥ सिद्धी पाववी सर्वेशा ॥८॥

आकाशरायाचे घेवोनि पत्र ॥ वेंकटाद्रीसी निघाला व्यासपुत्र ॥ गतकथाध्यायी विचित्र ॥ मनोहर वर्णिली ॥९॥

आता पुढील अनुसंधान ॥ जनक म्हणे शतानंदालागून ॥ बोल रसाळ कथागहन ॥ पुढे कैसे वर्तले ॥१०॥

शतानंद म्हणे राया ॥ ऐक आता चित्त देऊनिया ॥ जे ऐकता पाविजे विजया ॥ होय काया पावन ॥११॥

पत्र घेवोनि बादरायणी ॥ पावला वेंकटाद्री लागूनी ॥ येता देखिले दुरोनी ॥ श्रीनिवासे ते काळी ॥१२॥

सामोरा येवोनि दीनदयाळ ॥ वंदिले ऋषीचे चरणकमळ ॥ म्हणे कार्य सफळ की निष्फळ ॥ सांग आदि ऋषिवर्या ॥१३॥

यावरी शुक बोले गोष्टी ॥ तू ब्रह्मांड नायक जगजेठी ॥ इच्छा मात्रे सर्वसृष्टी ॥ घडामोडी करिशी पै ॥१४॥

तुझे कार्य निष्फळ ॥ कैसे होईल सर्वकाळ ॥ तू परब्रह्म तमाळनीळ ॥ सफळ कार्य तुझे असे ॥१५॥

हरीनी शुकासि आलिंगूनी ॥ बैसउनी दिव्यासनी ॥ वर्तमान मुळीहूनी ॥ पुसिले सर्व ऋषीप्रती ॥१६॥

मग रायाचे जे का लिखित ॥ श्रीनिवासाचे करी देत ॥ ते उकलोनिया जगन्नाथ ॥ वाचिता जाहला ते काळी ॥१७॥

पत्रार्थ पाहोनी सर्व ॥ संतोषला रमाधव ॥ शुकाचे कंठी देवराव ॥ मिठी घाली स्वानंदे ॥१८॥

शुक म्हणे त्रिभुवनपती ॥ उत्तर देई पत्रावरुती ॥ ऐसे ऐकता कमळापती ॥ उतर निश्चिती लिहीतसे ॥१९॥

त्याचि पत्राखाली श्रीधर ॥ उत्तर लिहिता झाला सत्वर ॥ तेचि परिसावे श्रोते चतुर ॥ अत्यादरे करोनिया ॥२०॥

जितुके तीर्थ पृथ्वीवरुती ॥ तस्वरूप तू आकाशभूपते ॥ नारायणपुरीचा नरपती ॥ नमन तुजप्रती असो पै ॥२१॥

वेंकटाद्रीहूनी श्रीनिवास ॥ विज्ञापना करी विशेष ॥ व्यासपुत्र शुकाचार्यास ॥ पत्र देवोनि पाठविला ॥२२॥

तो पत्र घेवोनि लवलाही ॥ प्रविष्टला आम्हांशी सुसमयी ॥ पत्रार्थ पाहता सर्वही ॥ परमानंद जाहला ॥२३॥

पद्मसंभव कन्यासुंदरी ॥ आम्हांसि अर्पिली निर्धारी ॥ वैशाखशुद्ध दशमी भृगुवारी ॥ लग्न नेमिले असे पै ॥२४॥

त्या संधीसी येऊनी ॥ कार्यसिद्धी करावी म्हणोनी ॥ पत्राभिप्राय सर्वही मनी ॥ मनन जाहला निर्धारी ॥२५॥

तुमची आज्ञा प्रमाण ॥ केले आम्ही वचन मान्य ॥ पद्मसंभव कन्यारत्‍न ॥ अंगीकारिली निर्धारी ॥२६॥

वैशाखमासी निघोन ॥ येतो आम्ही लग्नाकारण ॥ ऐसे उत्तर लिहून ॥ शुका करी दीधले ॥२७॥

हरिआज्ञा घेवोनि त्वरा ॥ व्यास पुत्र गेला नारायणपुरा ॥ वर्तमान सांगता नृपवरा ॥ परमसंतोष जाहला ॥२८॥

इकडे बकुला निघोन ॥ आली वेंकटाद्रीसी त्वरेन ॥ भेटली वेंकटेशालागून ॥ वर्तमान श्रुतकरी ॥२९॥

म्हणे जगन्निवासा अवधारी ॥ आता कार्यसिद्धी जाहली खरी ॥ दृढनिश्चय करोनि निर्धारी ॥ मगराये पत्र दीधले ॥३०॥

श्रीहरी म्हणे धन्यमाते ॥ तुवा साधिला कार्यार्थ ॥ तुझे उपकार जाहले अगणित ॥ न विसंबे कदापि ॥३१॥

असो नानापरी नारायण ॥ गौरविले बकुले कारण ॥ स्वामिगौरव स्वमुखे करोन ॥ तुच्छ सुधा सत्यापुढे ॥३२॥

असो काही दिवस गेलियावरी ॥ बकुला म्हणे मधुकैटभारी ॥ लग्नाचे दिवस यावरी ॥ जवळी आले सर्वेशा ॥३३॥

अद्यापवरी साहित्य ॥ काहीच केले नाही सत्य ॥ तुजकडे वराडी यथार्थ ॥ कोणीच दिसत नाही की ॥३४॥

राजयाचे संगती ॥ त्याचे वराडी बहुत मिळती ॥ त्याही साहित्य नानारीती ॥ सिद्ध केले असेल ॥३५॥

आम्हाकडे न दिसे कोणी ॥ हेचि चिंता वाटे मनी ॥ पुराणपुरुषा मोक्षदानि ॥ कैसे यासि करावे ॥३६॥

बकुलेचे वचन ऐकोन ॥ हास्य करी नारायण ॥ म्हणे या चिंतेचे कारण ॥ काहीच नसे जननिये ॥३७॥

क्षणमात्रे सर्व साहित्य ॥ सिद्ध होईल पै यथार्थ ॥ वराडी मिळतील असंख्यात ॥ पाहे माते यावरी ॥३८॥

ऐसे बोलोनि जनार्दन ॥ केले गरुड शेषांचे स्मरण ॥ तात्काळ पातले दोघेजण ॥ श्रीनिवासा जवळी पै ॥३९॥

उभयता येवोनि ते वेळा ॥ वंदिले हरीचे चरणकमळा ॥ म्हणती भक्तवत्सला घननीळा ॥ कायते आज्ञा करावी ॥४०॥

दीनबंधो दितिज संहारा ॥ दयासागरा क्षीराब्धिविहारा ॥ कायती आज्ञा विश्वंभरा ॥ निरोपी आता आम्हाप्रती ॥४१॥

गरुडासि म्हणे ह्रषीकेशी ॥ तुवा जावे सत्यलोकासी ॥ माझी आज्ञा विधीपाशी ॥ कथन केली पाहिजे ॥४२॥

मी देतो लिखितपत्र ॥ ते घेवोनि जायसत्वर ॥ चतुर्दशलोकीचे राहणार ॥ लग्नाकारणे आणावे ॥४३॥

स्त्रियापुत्र अवघेजण ॥ आपुली सेनासंपती घेऊन ॥ वस्त्रालंकारसहित पूर्ण ॥ परमगजरे येईजे ॥४४॥

रथ अश्व कुंजर ॥ विमानादि वाहने परिकर ॥ सहित घेवोनी सत्वर ॥ वेंकटाद्रीसी यावे पै ॥४५॥

वैशाखशुद्ध दशमीसी ॥ लग्न नेमिले निश्चयेसी ॥ याकरणे गरुडा वेगेसी ॥ आताची जाई सत्वर ॥४६॥

मग स्वहस्ते लिहोनि पत्र ॥ गरुडाकरी दीधले सत्वर ॥ आज्ञा वंदोनी खगेश्वर ॥ सत्यलोकासी चालिला ॥४७॥

शेषाप्रती श्रीनिवास ॥ बोलता जाहला परमपुरुष ॥ तुवा जावोनि कैलासास ॥ शंकरासि बोलाविजे ॥४८॥

आकाशरायाची कन्यका ॥ पद्मावती नामे चंपककलिका ॥ मजलागी अर्पिली देखा ॥ आकाशराये प्रीतीने ॥४९॥

वैशाखशुद्धदशमी भृगुवार ॥ लग्ननेमिले असे साचार ॥ तुवा जावोनि सत्वर ॥ बोलवावे शंकराते ॥५०॥

स्कंद आणि गजानन ॥ अष्टसिद्धी अष्ट भैरव पूर्ण ॥ साठिकोटी शिवगण ॥ लग्नाकारणे येईजे ॥५१॥

नव कोटी कात्यायनी ॥ चौसष्टि कोटी महायोगिनी ॥ यांसहित गजास्य जननी ॥ लग्नाकारणे आणावी ॥५२॥

छप्पन्नकोटी चामुंडासहित ॥ जगन्मातेसी आणावे एथ ॥ तात्काळ देखोनी लिखित ॥ म्हणे आताचि जाई झडकरी ॥५३॥

चरण वंदोनी भोगिनाथ ॥ कैलासासि चालिला त्वरित ॥ इकडे सत्यलोकासि विष्णुरथ ॥ जाता जाहला ते काळी ॥५४॥

तो सभा घनवटली अपूर्व ॥ सिंहासनी बैसला कमळोद्भव ॥ सम्मुख उभे सर्वदेव ॥ करजोडोनि साक्षेप ॥५५॥

जैसे पुष्पराग रत्‍न ॥ तैसे प्रभामय ब्रह्मभुवन ॥ तेजोमय विराजमान ॥ पाहता मन भुलोनि जाय ॥५६॥

मरुद्गण पितृगण ॥ एकादश रुद्र द्वादशादित्य जाण ॥ अष्टवसु दिक्पाळ पूर्ण ॥ कर जोडोनी तिष्ठती ॥५७॥

यक्षगण गंधर्व किन्नर ॥ अष्टविनायकविद्याधर ॥ पुढे उभा सनत्कुमार ॥ करजोडोनी सर्वदा ॥५८॥

मूर्तिमंत वेद चारी ॥ तेथे असती जाण निर्धारी ॥ सरस्वती आणि सावित्री ॥ पादसेवन करती पै ॥५९॥

असो ऐसा सभेसि चतुरानन ॥ बैसला असता आनंदघन ॥ तो अकस्मात गुरूत्मान्‍ ॥ पत्र घेवोनी पातला ॥६०॥

वंदोनिया ब्रह्मयासी ॥ पत्र दीधले वेगेसी ॥ म्हणे आज्ञा दिधली ह्रषीकेश ॥ सत्वर लग्नासी चलावे ॥६१॥

घेवोनिया परिवार सहित ॥ वेंकटाद्रीसी यावे निश्चित ॥ मग कमलासन बोलत ॥ गरुडाकारणे ते काळी ॥६२॥

कोणाचे लग्न काय वर्तमान ॥ कन्या कोणाची नवरा कोण ॥ कोठे आहे जगन्मोहन ॥ भक्तवत्सल जगदात्मा ॥६३॥

बहुतदिवस नाही भेटी ॥ सुखी आहे की जगजेठी ॥ गरुडा तू असणार हरीनिकटी ॥ वर्तमान सर्व सांगे ॥६४॥

यावरी बोले विनतासुत ॥ वैकुंठी असता जगन्नाथ ॥ भृगुऋषीने मारिली लाथ ॥ श्रीनिवासासी निर्धारी ॥६५॥

त्या कोपे रुसोनी इंदिरा ॥ जाती जाहली करवीरपुरा ॥ तिच्या वियोगे वैकुंठपुरा ॥ त्यागोनी महीवरी पातले ॥६६॥

श्रीवेंकटाद्रि गिरिवरी ॥ राहता जाहला मधुकैटभारी ॥ आकाशरायाची कुमारी ॥ पद्मसंभव कन्या असे ॥६७॥

ते दीधली श्रीहरीप्रती ॥ वैशाखमासी लग्ननिश्चिती ॥ याकारणे श्रीपती ॥ तुम्हा लागी बोलाविले ॥६८॥

ऐकता ऐसे वर्तमान ॥ आनंदला कमलासन ॥ लग्नपत्रिका उकलोन ॥ वाचिता झाला ते काळी ॥६९॥

सुवर्णाक्षर सुंदर ॥ पत्रिका लिहिली मनोहर ॥ जैसा पूर्णिमेचा चंद्र ॥ तैसे दिसे पत्र ते ॥७०॥

जो सरस्वतीच्या पतीचा पिता ॥ काय त्या अक्षरांची कौशल्यता ॥ सहस्त्रवदनासि वर्णिता ॥ नवर्णवेची सहसाही ॥७१॥

पत्रवाचित कमलोद्भव ॥ सभाजन ऐकती सर्व ॥ देवगण आणि गंधर्व ॥ सावधान होवोनिया ॥७२॥

चिरंजीवा दीर्घायुष्या ॥ चतुरानना सत्यलोकेशा ॥ वेंकटाद्रीहूनि श्रीनिवास ॥ आशीर्वाद लिहितसे ॥७३॥

सोमवंशीचा भूभुज ॥ नाम तयाचे आकाशराज ॥ त्याची कन्या परमसतेज ॥ पद्मावती नाम तिचे ॥७४॥

ती दिधली मजसी ॥ वैशाख शुद्ध दशमी दिवशी ॥ लग्न नेमिले निश्चयेसी ॥ यास्तव तुम्हासी लिहिले असे ॥७५॥

सहकुटुंब सहपरिवार ॥ तेत्तिसकोटी देवसमग्र ॥ सहित स्त्रियावस्त्रालंकार ॥ समवेत निघोनि येईजे ॥७६॥

विलंब न करावा यथार्थ ॥ पत्र पाहताचि निघा समस्त ॥ ऐसे ऐकताची सत्य ॥ आनंद भरित जाहले ॥७७॥

मग आज्ञापी कमळासन ॥ म्हणे दुंदुभी वाद्य वाजवोन ॥ श्रुत करावे सर्वालागून ॥ वेंकटाद्रीसी जावया ॥७८॥

सेवक धावले चहूकडोन ॥ चतुर्दशलोकी जाणविले पूर्ण ॥ निघा सर्व अविलंबे करून ॥ लग्नाकारणे निर्धारी ॥७९॥

ऐसी आज्ञा परिसोन ॥ लगबग करिती अवघेजण ॥ नुतन वस्त्रालंकार नेसून ॥ सिद्ध जाहले तात्काळी ॥८०॥

सत्यलोकींचे सर्वजण ॥ निघाले हंसारूढ होवोन ॥ सावित्रि आदि स्त्रियापूर्ण ॥ मुख्य तिघे जणी निघाल्या ॥८१॥

लेऊनि अमोल्य वस्त्रालंकार ॥ दिसती जेवि विद्युलतांचे भार ॥ आपापले वाहनी सत्वर ॥ बैसते जाहले सर्वही ॥८२॥

तंतवितंत घन सुस्वर ॥ चतुर्विध वाद्यांचे लागले गजर ॥ तेणे नाद अंबर ॥ दणाणिले ते काळी ॥८३॥

शची सहित पुरंदर ॥ ऐरावतारूढ निघाला सत्वर ॥ दुंदुभी वाजती एकसरे ॥ परमानंदे करोनिया ॥८४॥

इंद्र अग्नि यम नैऋत्य ॥ वरुण समीर कुबेर सत्य ॥ परिवारेसि दिक्पाळ यथार्थ ॥ निघते जाहले ते काळी ॥८५॥

मरुद्गण पितृगण ॥ एकादश रुद्र द्वादशादित्य जाण ॥ अष्टवसु गंधर्व गण ॥ अष्टनायिका निघाल्या ॥८६॥

यक्ष आणि किन्नर ॥ निघाले नारद आणि तुंबर ॥ सनकसनंदन सनत्कुमार ॥ निघते जाहले ते काळी ॥८७॥

मित्रलोक चंद्रलोक ॥ निघाले सर्वतेथींचे लोक ॥ आपुली संपत्ति घेवोनी सकळिक ॥ पहावया कौतुक पातले ॥८८॥

सत्यलोकापासून ॥ स्वर्लोकापर्यंत संपूर्ण ॥ स्त्रिया पुरुष थोर लहान ॥ सर्वजण पातले ॥८९॥

अवघे होवोनी एकत्र ॥ धडकत वाद्यांचे गजर ॥ वेंकटाद्रि लक्षोनि साचार ॥ उतरते जाहले सर्वही ॥९०॥

असंभाव्य नभ मंडळी ॥ विमानांची दाटी जाहली ॥ रथ अश्व कुंजर याने सकाळी ॥ उतरताती भूमीवरी ॥९१॥

अत्यंत गजर ऐकोन ॥ बकुला पाहे बाहेर येवोन ॥ तो वाद्यनादे गगन ॥ कोंदोनिया गेले असे ॥९२॥

वरते पाहे ते अवसरी ॥ तो असंभाव्य पुष्करी ॥ बकुला मनी आश्चर्यकरी ॥ श्रीहरीप्रती बोलतसे ॥९३॥

म्हणे हे पुराणपुरुषोत्तमा ॥ अज अजित मेघश्यामा ॥ मायातीता परब्रह्मा ॥ पूर्णकामा श्रीनिवासा ॥९४॥

आश्चर्य दिसते मजप्रती ॥ काय दाटले आकाशावरुती ॥ असंख्य वाद्ये वाजती ॥ नवल श्रीपति वाटतसे ॥९५॥

मग परमात्मा शेषशायी ॥ बकुलेसी बोले ते समयी ॥ म्हणे माते हे सर्वही ॥ वराडी पातले लग्नासी ॥९६॥

कोणीच नाही आम्हापाशी ॥ म्हणोनि चिंता तुझे मानसी ॥ हे वरादी पाहे कुटुंबेसी ॥ पातले आता जननिये ॥९७॥

ऐसे बोलता नारायण ॥ तो अकस्मात उतरले सुरगण ॥ दाटी जाहली संपूर्ण ॥ शेषाद्रीवरी ते काळी ॥९८॥

रथ अश्व वाहन समस्त ॥ सैरावैर उतरले तेथ ॥ तेत्तिस कोटि सुरगण सत्य ॥ वेंकटाद्रीवरी मिळाले ॥९९॥

मुख्य त्यात दोघे जण ॥ कमलोद्भव आणि शचीरमण ॥ श्रीहरीचे दर्शनाकारणे ॥ पुढे चालिले ते काळी ॥१००॥

मागूनि चालिले सर्व देव ॥ मंदिरी बैसले रमाधव ॥ कमळासन आणि वासव ॥ साष्टांग नमन करिती पै ॥१॥

मग अनुक्रमे करोन ॥ सर्व देवी वंदिले हरिचरण ॥ सावित्र्यादि स्त्रिया अवघ्या जणी ॥ श्रीहरीचे चरण वंदिले ॥२॥

असो यथावकाश सर्व ॥ पर्वतावरी उतरले देव ॥ इकडे कैलासासि भोगिराव ॥ पत्र घेवोनि पावला ॥३॥

शुभ्र वर्ण कैलासभुवन ॥ उंच सतेज विराजमान ॥ शुभ्र मंडप विशाळ गहन ॥ सिंहासन शुभ्र दिसतसे ॥४॥

घवघवीत दिसे कर्पूरगौर ॥ मृडानी सहित जगदुद्धार ॥ पुढे विराजे नंदिकेश्वर ॥ शुभ्रवर्ण उभा असे ॥५॥

गजानन स्कंद वीरभद्र ॥ कर जोडोनी उभे समोर ॥ नारद आणि तुंबर ॥ गाती सर्वदा शिवलीला ॥६॥

चौदा भुवनी अधिपसत्य ॥ ते एथे असती होवोनि भृत्य ॥ तेत्तिस कोटी देव समस्त ॥ त्रिकाळ येती दर्शनासी ॥७॥

रजतमांची वार्ता ॥ तेथे नाहीच सर्वथा ॥ वैराग्यशीळ पाहता ॥ जन तेथींचे सर्वही ॥८॥

साठिकोटी गण समग्र ॥ उभे असती शंकरा समोर ॥ अर्धांगी गिरिजा सुंदर ॥ जगन्माता बैसली ॥९॥

सर्वांगी चर्चिले भस्म ॥ सर्वभूषणे शोभती परम ॥ व्याघ्राजिन गजाजिन उत्तम ॥ रुंडमाळा सतेज ॥११०॥

दशभुज आयुधे सुंदर ॥ विराजमान नीलकंधर ॥ ललाटी शोभे किशोरचंद्र ॥ मस्तकी नीर वाहतसे ॥११॥

उदार सुहास्य वदन सुंदर ॥ तृतीयनेत्री वैश्वानर ॥ ऐसे स्वरूप मनोहर ॥ कद्‌रुतनये देखिले ॥१२॥

पत्र करी देवोनी उत्तम ॥ चरणी लागला भुजंगम ॥ विनत होवोनी सप्रेम ॥ बोलता जाहला तेकाळी ॥१३॥

म्हणे पंचदश नयना त्रिपुरारी ॥ हिमनगजामाता खट्‌वांगधारी ॥ सर्वव्यापका सर्वांतरी ॥ नांदसी निर्धारी विश्वेशा ॥१४॥

श्रीवेंकटेशगिरी पासोन ॥ आलो स्वामिदर्शना लागोन ॥ श्रीनिवासे तुम्हाकारण ॥ बोलाविले जगदीशा ॥१५॥

पत्र दीधले नारायणे ॥ ते पहावे आता वाचून ॥ सहपरिवारे लग्नाकारण ॥ श्रीवेंकटाद्रीशी चलावे ॥१६॥

ऐसे ऐकताचि वचन ॥ सदाशिव परम आनंदोन ॥ तात्काळ पत्र उकलोन ॥ पाहता जाहला जगदात्मा ॥१७॥

पत्रात लिहिले नारायणे ॥ तेचि परिसा श्रोतेजन ॥ सावध ऐकती सभाजन ॥ गिरिजे सहित ते काळी ॥१८॥

श्रीमत्कैलासाचळविहारा ॥ मीनकेतनारे अंधकसंहारा ॥ भक्तकैवारी त्रिपुरहरा ॥ श्रीशंकरा उमापते ॥१९॥

श्रीनिवास साष्टांग नमन ॥ करी तुज वेंकटाद्रीहून ॥ तुझे कृपेने क्षेम कल्याण ॥ आजिवरी असे पै ॥१२०॥

आता पत्र ल्याहावयासी कारण ॥ आकाशराज गुणनिधान ॥ त्याची कन्या परमसगुण ॥ पद्मावती नामे असे ॥२१॥

ती दीधली मजप्रते ॥ लग्न धरिले यथायुक्ती ॥ वैशाखशुद्धपक्ष निश्चित्ती ॥ दशमी भृगुवारी नेमिले ॥२२॥

याकरिता भोगिभूषणा ॥ परिसावी माझी विज्ञापना ॥ सहपरिवारे निघोन ॥ लग्नाकारणे येईजे ॥२३॥

कुमार आणि करिराजवक्र ॥ साठिकोटी गण समग्र ॥ आपापले शस्त्रवस्त्र ॥ सहित त्वरे येईजे ॥२४॥

सखियासहित त्रिजगज्जननी ॥ संगे आणावी हेरंबजननी ॥ एवं सर्वासहित निघोनी वेंकटाद्रीसी येइजे ॥२५॥

ऐसे पत्र पाहता निर्धारी ॥ आनंद मय जाहला त्रिपुरारी ॥ सर्वांसही आज्ञा करी ॥ निघाला झडकरी अविलंबे ॥२६॥

मग तात्काळ अवघे जण ॥ सिद्ध जाहले शिवगण ॥ नाना वाहने आणि विमान ॥ आरूढ ते जाहले ॥२७॥

सर्वांआधी विनायक ॥ निघता जाहला विघ्ननाशक ॥ सिद्ध करोनिया मूषक ॥ तयावरी बैसला ॥२८॥

मयूरारूढ षाण्मातुर ॥ निघता जाहला हो सत्वर ॥ नंदिवाहन कर्पूरगौर ॥ सिद्धकरोनि चालिले ॥२९॥

आदिमाता हिमनगनंदिनी ॥ तात्काळ निघाली सिंहवाहिनी ॥ सवे निघाल्या कात्यायनी ॥ चामुंडा योगिनी समवेत ॥१३०॥

साठिकोटि गण समग्र ॥ नानावाद्ये वाजविती परिकर ॥ लक्षोनि वेंकटाद्री गिरिवर ॥ उतरते झाले ते काळी ॥३१॥

वृषभ सिंहासी वैरदेख ॥ तैसेचि सर्प आणि मूषक ॥ परी निर्वैर चालती कौतुके ॥ करणी अद्भुत शिवाची ॥३२॥

असो ऐशा गजरेंशी ॥ पावले वेगे वेंकटाद्रीसी ॥ भेटावया श्रीहरीसी ॥ येता जाहला सदाशिव ॥३३॥

सामोरा जावोनि जगज्जीवन ॥ वंदिले मदनारीचे चरण ॥ एकमेकांसी आलिंगन ॥ देते जाहले ते काळी ॥३४॥

देवांसमवेत कमळासने ॥ शिवासि वंदिले प्रीतीकरून ॥ मग सर्वांसहित नारायण ॥ सभा करोनि बैसला ॥३५॥

जिकडे होता स्त्रियांचा मेळा ॥ तिकडे गेली हिमनगबाळा ॥ सावित्री आदि स्त्रिया सकळा ॥ एकीकडे राहिल्या ॥३६॥

असो यावरी नारायण ॥ विश्वकर्म्यासि बोलावून ॥ आज्ञा दिधली मनमोहने ॥ न लागता क्षण ते काळी ॥३७॥

म्हणे तुवा नारायणपुरा जाऊन ॥ मंडप रचावे विस्तीर्ण ॥ सर्वांसही उतरावया कारण ॥ शोभायमान करावे ॥३८॥

हेमरत्न अलंकृत ॥ मंडप रचावे शोभिवंत ॥ स्त्रियांसि रहावया तेथ ॥ प्रत्येक स्थळ निर्मावे ॥३९॥

बैसावया सभास्थान ॥ करावे सुंदर प्रभाघन ॥ उदकाच्या पुष्करणी जाण ॥ स्थळो स्थळी कराव्या ॥१४०॥

लग्नाचे दिवस आले समीप ॥ शीघ्र जाहले पाहिजेत मंडप ॥ ऐसी आज्ञा वैकुंठाधिप ॥ देता जाहला तेधवा ॥४१॥

अवश्य म्हणोनि झडकरी ॥ विश्वकर्मा निघाला ते अवसरी ॥ येवोनिया नारायणपुरी ॥ मंडपासी आरंभिले ॥४२॥

जे का मर्गज पाषाण ॥ याहीच पाया काढिला भरून ॥ काश्मीराचे मंडपांगण ॥ साधिता जाहला ते काळी ॥४३॥

स्फटिक शिळेची पोवळी ॥ आठहि आया साधिली तळी ॥ अष्टकोनी महाबळी ॥ अष्टदिक्पाळ स्थापिले ॥४४॥

काश्मीराच्या रचिल्या भिंती ॥ हिरियाचे खांब लखलखिती ॥ सुवर्णाची तुळवटे निश्चिती ॥ लंबायमान पसरली ॥४५॥

मंडप सर्वदा प्रभाघन ॥ नाही चंद्रसूर्याचे कारण ॥ रत्नमय प्रकाशगहन ॥ अंतरबाह्य लखलखितसे ॥४६॥

हिरियाचे केले सोपान ॥ पुष्परागांच्या चवकटी विराजमान ॥ पद्मरागाचे तोळंबे पूर्ण ॥ मनोहर दिसती ॥४७॥

शतखणी मंडप विचित्र ॥ मुक्ताफळांचे सोडिले जालंदर ॥ नीळरत्नाचे मयूर ॥ प्राण नसता धावती ॥४८॥

गरुड पाचूचे कीर ॥ शब्द करिती नवलथोर ॥ भिंतीवरी लिहिले चित्र ॥ छपन्नदेशींचे सर्वही ॥४९॥

ते पाहता मंडपस्थान ॥ तेणे अवघी पृथ्वी पाहिली पूर्ण ॥ सुरगण गंधर्व मुनिजन ॥ चित्रे लिहिली भिंतीवरी ॥१५०॥

शाण्णावकुळीचे राजे परिकर ॥ ज्याची आकृति जैसी साचार ॥ तैसेचि लिहिले भिंतीवर ॥ नवल थोर वाटतसे ॥५१॥

स्थळी स्थळी पुष्करणी सुंदर ॥ माजी भरिले सुवासनीर॥ वर्णिता तेथींचा विस्तार ॥ सहस्त्रवर्षे न सरेची ॥५२॥

तीन सहस्त्र योजन ॥ मंडप केले विस्तीर्ण ॥ पृथ्वीवरील सौंदर्य पूर्ण ॥ एकवटले तयास्थळी ॥५३॥

घटिके न घटिका दिवस भरता ॥ तास पिटी पुतळी तत्वता ॥ ते स्थान पाहता ॥ तृप्ती नाही मनाते ॥५४॥

असो ऐसे रचोनि दिव्यमंदिर ॥ वेंकटाद्रीसी पातला सत्वर ॥ विश्वकर्म्याने जगदुद्धार ॥ साष्टांग नमिला प्रीतीने ॥५५॥

म्हणे आदि पुरुषा श्रीनिवासा ॥ भक्तवत्सला क्षीराब्धिवासा ॥ दीनदयाळा मायावेषा ॥ परमपुरुषा श्रीहरी ॥५६॥

हरी तुझी आज्ञा प्रमाण ॥ मंडप निर्मिले शोभायमान ॥ ऐकता संतोषला रमारमण ॥ गौरविले विश्वकर्म्याते ॥५७॥

वेंकटेश विजय ग्रंथगहन ॥ हाचि केवळ आनंदवन ॥ भक्तियुक्त भाविकजन ॥ यात्रे लागी धावती ॥५८॥

प्रेम हे जान्हवी नीर ॥ स्नान करोनी सज्जन नर ॥ श्रीवेंकटेश हा विश्वेश्वर ॥ दर्शनालागी धावती ॥५९॥

दर्शन घेवोनी जाण ॥ जे करिती पारायण प्रदक्षिणा ॥ त्यांचे तुटोनि जन्ममरण ॥ कैवल्यधामा पावती ॥१६०॥

पुढील अध्यायी विचित्र ॥ कथा असे परम मनोहर ॥ ते श्रवण करिता दोष समग्र ॥ भस्म होती एकदाची ॥६१॥

ती कथा गोड गहन ॥ श्रवण करोत पंडितजन ॥ तेणे तुष्टे नारायण ॥ श्रीवेंकटेश दयाब्धि ॥६२॥

आदि पुरुषा निर्विकारा ॥ श्रीमच्छेषाचल विहारा ॥ वीरवरदा रमावरा ॥ जगदुद्धारा जगत्पती ॥६३॥

इति श्रीवेंकटेशविजयसुंदर ॥ संमतपुराण भविष्योत्तर ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ अष्टमाध्याय गोड हा ॥१६४॥८॥

एकंदर ओवीसंख्या ॥१३०३॥