श्री वेंकटेश विजय

वेदव्यासांनी भविष्योत्तर पुराणात वेंकटगिरीचा महिमा सांगितला आहे. या कलियुगात जे कोणी त्यांची भक्ती करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.


अध्याय ७ वा

मागील अध्यायाच्या शेवटी सांगितल्याप्रमाणे बकुला नारायणपुरास आली. तेथे तिला पद्मावतीच्या सखी भेटल्या. बकुलेने त्यांना विचारले असता त्या बकुलेला म्हणू लागल्या-

'सोमवंशात आकाश नावाचा राजा आहे. त्याची पद्मावती नावाची मुलगी आमची सखी आहे. तिच्याबरोबर आम्ही उद्यानात खेळत असतो. एके दिवशी आम्ही उद्यानात फुले आणावयास गेलो असता घोड्यावरून त्या ठिकाणी आलेला एक अतिशय सुंदर कुमार आमच्या सखीने पाहिला; तो तिच्या मनात फारच भरला आहे.'

पद्मावतीने आम्हास त्याची चौकशी करण्यास सांगितले. आम्ही विचारले असता आम्हास काही न सांगता तो थेट पद्मावतीकडे जाऊन त्याने तिला आपली हकीकत सांगितली. 'मी क्षत्रिय आहे. वेंकटगिरीवर मी राहतो. माझे नाव श्रीनिवास आहे. चंद्रवंशात माझा जन्म झाला आहे. माझे आई वडील देवकी व वसुदेव असून बलिराम माझा भाऊ आहे.'

नंतर त्याने पद्मावतीकडे तिच्या कुळगोत्राची चौकशी केली. तिने ही आपली हकीकत त्यास सांगितली. 'मी क्षत्रिय आहे. वेंकटगिरीवर मी राहतो. माझे नाव श्रीनिवास आहे. चंद्रवंशात माझा जन्म झाला आहे. माझे आई वडील देवकी व वसुदेव असून बलिराम माझा भाऊ आहे.'

नंतर त्याने पद्मावतीकडे तिच्या कुळगोत्राची चौकशी केली. तिने ही आपली हकीकत त्यास सांगितली.

पुढे भिल्लाचा वेष घेतलेल्या श्रीनिवासाने 'आपली लग्न करण्याची इच्छा असून तू वरावेस' असे म्हणता पद्मावतीस फार राग आला व त्या सख्यांसह ती नगराकडे निघाली असता त्याच्या मागून तो पुरुष जाऊ लागला. तेव्हा त्यांनी त्यास दगडाने मारण्यास सुरुवात केली. त्याचा घोडा वाटेत मरण पावला व तो पुरुष उत्तर दिशेकडे निघून गेला. आम्ही आमच्या मंदिराकडे आलो. तेव्हापासून आमची सखी पद्मावती त्याच्या विरहज्वराने व्याकूळ झाली आहे. तिच्या आजारीपणाने सर्व घाबरून गेले आहेत. वैद्य ज्योतिषी इत्यादिकांचे उपचार चालू आहेत; पण गुण नाही. नंतर राजाने आपल्या कन्येची हकीकत त्यांना सांगितली. त्यांनी श्रीशिवास अभिषेक करावयास सांगितले. राजाने कुलगुरूंच्या विचाराप्रमाणे उत्तम प्रकारची साधनसामग्री जमा करून अनुष्ठान सुरू केले आहे. आम्ही तिच्या सर्व सखी देवदर्शनास आलो आहोत.

नंतर त्या मुलींनी बकुलेला हकीकत विचारली. तिने 'मी वेंकटेशाची दासी आहे. काही काम मनात योजून आले आहे. मला राजमातेचे दर्शन घडवाल काय असे विचारताच मुली म्हणाल्या, 'मुलीच्या आजारीपणामुळे धरणीदेवी दुःखी आहे. आता भेटण्यास वेळ मिळणार नाही. गावातील स्त्रिया जातील त्यांचेबरोबर जा व राणीची गाठ घे' बकुला वेळेची वाट पहात थांबली.

इकडे वेंकटेशांनी विचार केला की, बकुला स्त्री आहे तिज एकटीकडून कार्य होणार नाही. आपण आणखी काही प्रयत्न केला पाहिजे. म्हणून स्वतः भिल्लीणीचा वेष घ्यावयाचे ठरवून ब्रह्मदेवास बोलावून लहान मुलाचा वेष घेण्याची आज्ञा केली. मलिन वस्त्रे धारण करून ओट्यात लहान मुलास बांधून घेऊन नाचत नाचत नारायणपुरास आली. तिने गावातील लोकांना ओरडून सांगण्यास सुरुवात केली. 'मी भूतभविष्य जाणणारी आहे. कोणास कशाची इच्छा असेल तर ती मजकडून पूर्ण करून घ्या. तुमचे सर्व मनोरथ मी पूर्ण करीन.'

हे तिचे भाषण ऐकून सर्व स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या व त्यांनी राजमाता धरणीदेवीस तिची हकीकत सांगितली. राणी धरणीने तिला राजवाड्यात आणण्यास सांगितले. स्त्रियांनी जाऊन राणीची व राजकन्येची सर्व हकीकत तिला सांगताच ती म्हणाली, 'माझे हे मलीन कपडे पाहून राजवाड्यातील लोक मला हसतील. मी दरिद्री आहे. त्या धर्मदेवीस अनेक प्रकारे समजावून स्त्रियांनी तिला राजवाड्यात नेले. राणीने तिची सर्व चौकशी केली. तिने आपली हकीकत सांगताच राणीने आपल्या मुलीचा आजार तिच्या कानावर घातला.

तिने राणीस शुभ्र वस्त्र नेसून आपणास वायन देण्यास सांगितले. आपल्या मुलास पिण्यास दूध मागून घेतले. भोजन करून तांबूल वगैरे खाऊन झाल्यावर तिने सर्व देवतांचे स्मरण केले व ती म्हणाली, 'तुझ्या मुलीस भूतबाधा वगैरे काही नाही. तिने बागेत एक सुंदर पुरुष पाहिला असून त्याच्यावर तिचे मन बसले आहे. तिला विचारून खात्री करुन घे!'

तसेच तो तिच्या मागून येत असता मुलींनी त्यास दगड मारून परत पाठविले; व तो उत्तरेकडे गेला. राणीने आपल्या मुलीस विचारता ही सर्व हकीकत खरी असल्याचे तिला समजून आले. राणीने भिल्लीणीस परत येऊन सर्व खरे असल्याचे सांगितले. तिने त्या पुरुषास कोणताही विचार न करता मुलगी देण्यास सांगितले. न दिल्यास मुलगी वाचणार नाही असे सांगताच राणी घाबरली. राजाचा सल्ला घेऊन त्या पुरुषाचा शोध करण्यास तिने सांगितले. इतक्यात अभिषेकाचा प्रसाद घेऊन ब्राह्मण आले. त्यांना राजाने भोजन-दक्षिणा वगैरे देऊन निरोप दिला. वेंकटेशाकडून एक दासी आल्याचे त्यावेळी राजास समजले. तिला राजवाड्यात बोलावून आणून सर्व स्त्रियांनी तिची चौकशी केली. तिने आपली व वेंकटेशाची सर्व माहिती सांगितली. राजाने वेंकटेशाचे कुलगोत्र वगैरे आपल्या मुलीच्या गणगोत्राशी जुळवून पाहता ३६ गुण उतरले. त्यावेळी राजाच्या मनात एक शंका आली. असा हा सर्व गुणसंपन्न मुलगा असता याचे लग्न अद्याप का झाले नाही. त्यावेळी बकुलेने संततीकरिता हा दुसरे लग्न करतो आहे असे सांगताच राजाचा संशय दूर झाला.

देवगुरु बृहस्पतीनीही वेंकटेशाचे वर्णन 'तुझ्या मुलीस हा वर मिळाल्यास मुलीचे भाग्य थोर आहे असे समज' असे सांगताच राजास फार आनंद झाला. आणि देवगुरु म्हणाले, 'येथुन जवळच अरण्यात शुक्राचार्य नावाचे थोर ऋषि राहतात त्यांना आणून सर्व हकीकत विचार. वेंकटेशावर त्यांचे फार प्रेम आहे. राजाने रथ पाठवून त्यांना बोलावून आणविले. सर्व हकीकत राजास सांगितली. राजा म्हणाला असा थोर जावई आम्हास कसा मिळणार तेव्हा शुकाचार्य म्हणाले- 'राजा तू एक पत्र लिहून दे.' राजाने पत्र लिहून दिले. महामुनी शुकाचार्यांनी पत्र दिल्यानंतरचा इतिहास पुढील अध्याय पाहू.

श्रीशेषाद्रिनिलयायनमः ॥ जय क्षीराब्धिनिवासिया ॥ श्रीवेंकटेशा निरामया ॥ निर्विकल्पवृक्षा करुणालया ॥ शेषाद्रिनिलया जगद्‍गुरू ॥१॥

नमो सर्गस्थित्यंतकारणा ॥ चक्रपाणि नागांतक वाहना ॥ वैकुंठपति मुरमर्दना ॥ कैटभारि जगदात्मया ॥२॥

मीनकेतनारि ह्रदयजीवना ॥ हे सनकसनंदनमानसरंजना ॥ भक्तह्रदयारविंदवर्धना ॥ जनार्दना प्रतापिया ॥३॥

तुझी लीला जगन्नाथा ॥ ना सरे कोटीवर्षे वाखाणिता ॥ सहस्त्रवदन भागला वर्णिता ॥ पाडकाय इतरांचे ॥४॥

मी मानव शलभ पामर ॥ केवी क्रमू गुणसागर ॥ जरी तू मनी धरशील साचार ॥ तरी काय एक न होय ॥५॥

असो पूर्वाध्यायाचे अंती ॥ बकुला आली नारायणपुरा प्रती ॥ शिवालयी भेटल्या तियेप्रती ॥ पद्मावतीच्या सख्या सर्व ॥६॥

बकुला त्यांशी पुसत ॥ कैसा जाहला वृत्तांत ॥ मग कन्या बोलती समस्त ॥ बकुलेप्रती आदरे ॥७॥

सोमवंशी आकाशनृपवर ॥ त्याची कन्या पद्मावती सुंदर ॥ ती आमुची सखी परिकर ॥ क्रीडतो आम्ही तिजसवे ॥८॥

एके दिवशी आम्ही समस्त ॥ वनासी गेलो पद्मावतीसहित ॥ सुंदरपुष्पवाटिके आत ॥ सुमने सुवास आणावया ॥९॥

नानाजातीचे कुसुम ॥ शोभायमान विकसले उत्तम ॥ नानाफळांकित द्रुम ॥ भेदित व्योम गेले पै ॥१०॥

तया वनामाजी क्रीडता ॥ एकपुरुष आला अवचिता ॥ किरातरूप जाहला धर्ता ॥ अश्वारूढ होवोनिया ॥११॥

वदन त्याचे मनोहर ॥ विराजमान श्यामसुंदर ॥ कंठी वैजयंती परिकर ॥ तुळशीवनमाळा शोभती ॥१२॥

सुहास्यवदन राजीवनयन ॥ कर्णी कुंडले प्रभाघन ॥ दिसती शशिमित्रा समान ॥ बाहुभूषणे शोभती ॥१३॥

जैसा नभी विराजे दिनमणी ॥ तैसे कौस्तुभ तेज पडिले मेदिनी ॥ कोटिकंदर्प त्यावरोनी ॥ वोवाळोनि टाकावे ॥१४॥

जन्मारभ्य ऐसा सुम्दर ॥ न देखिला माते साचार ॥ विलोकिता त्याचा मुखचंद्र ॥ नेत्रचकोर वेधले ॥१५॥

त्याचे विलोकिता वदन ॥ वेधले पद्मावतीचे नयन ॥ ह्रदयी दाटले पंचबाण ॥ तया पुरुषासी पाहता ॥१६॥

म्हणे सख्याहो पुरुषकोण ॥ पुसा त्यासी वर्तमान ॥ मग आम्ही तया लागून ॥ वर्तमान पुसिले ॥१७॥

म्हणालो तुम्ही कोठील कोण ॥ एथे यावया काय कारण ॥ जनक जननी राहते स्थान ॥ सांग आम्हांसी सर्वही ॥१८॥

आम्हासी न बोलता वेगेसी ॥ पातला तो पद्मावती पाशी ॥ तिशी म्हणे लावण्यराशी ॥ वर्तमान ऐक सर्व ॥१९॥

मी आहे क्षत्रिय परियेस ॥ वेंकटाद्रीस करितो वास ॥ नाम माझे श्रीनिवास ॥ चंद्रवंश आमुचा ॥२०॥

वसुदेव होय आपुला पिता ॥ देवकी नामे माझी माता ॥ बंधु बळिभद्र तत्वता ॥ यादवकुळ आमुचे ॥२१॥

ऐसे आमुचे वर्तमान ॥ आता तू आहेस कोणाची कोण ॥ ते सर्व सांग म्हणोन ॥ पद्मावतीस बोलिला ॥२२॥

ती म्हणे चंद्रवंशात ॥ आकाश नाम राव विख्यात ॥ त्यांची कन्या निश्चित ॥ पद्मावती नाम माझे ॥२३॥

मग किरातवेषी बोलत ॥ मी कन्यार्थी पातलो एथ ॥ पाहोनि तुझे स्वरूपाते ॥ मन माझे मोहिले असे ॥२४॥

तरी तू आता झडकरी ॥ मजलागी वरी सुंदरी ॥ ऐसे शब्द ऐकता श्रोत्री ॥ कोपली अंतरी पद्मावती ॥२५॥

मग सर्व कन्या मिळोन ॥ स्वनगरात परतलो वेगे करून ॥ पाठिसि पुरुष येतो जाणोन ॥ पाषाणवर्षलो तयावरी ॥२६॥

पाषणप्रहारे करोन ॥ अश्व भंगला न लागता क्षण ॥ मग तो पुरुषनिघोन ॥ उत्तर दिशेसी गेला पै ॥२७॥

आम्ही आलो स्वमंदिरा ॥ परी पद्मावती सुंदरा ॥ व्यापोनिया विरहज्वरा ॥ अत्यंत मूर्च्छित जाहली ॥२८॥

नाही देहाचे स्मरण ॥ न करी कोणासी भाषण ॥ त्यागोनिया अन्नपान ॥ विकळ होऊनी पडियेली ॥२९॥

कन्या पाहोनिया विकळ ॥ जन घाबरले हो सकळ ॥ धावोनि आला नृपाळ ॥ कन्ये जवळी तेधवा ॥३०॥

राजपत्‍नी घाबरी त्वरित ॥ कन्येकारणे शोक करित ॥ दृष्टावली असे निश्चित ॥ म्हणोनि सांडिती वोवाळणी ॥३१॥

वैद्य नाडी पाहती ॥ पित्त क्षोभ जाहला म्हणती ॥ ज्योतिषी प्रश्न पाहती ॥ ग्रहपीडा म्हणती इयेते ॥३२॥

नाना परीचे जप दान ॥ करविती कन्येकारण ॥ मांत्रिक म्हणती बाधा दारुण ॥ झडपले जाण इयेते ॥३३॥

तेणेचि वोळखी मोडिली ॥ ऐसे तर्क करिती सकळी ॥ परी हे महद्भूते घेतली ॥ हे न कळे कोणासी ॥३४॥

नाना परी प्रयत्न ॥ करिता नव्हे समाधान ॥ राजा चिंताक्रांते होवोन ॥ आपुल्या गुरूसी पाचारिले ॥३५॥

तात्काळ पातला देवाचार्य ॥ चरणी लागला नृपवर्य ॥ म्हणे कन्येसी उपाय काय ॥ करू लवलाहे गुरुवर्या ॥३६॥

गुरूंनी पाहोनि दृष्टीसी ॥ मग म्हणे राजयासी ॥ अभिषेक करवी सदाशिवासी ॥ अरिष्ट नासेल सर्वही ॥३७॥

उत्तम ब्राह्मण निवडोन ॥ करावे विधियुक्त अभिषेचन ॥ तात्काळ आज्ञा वंदून ॥ अनुष्ठाना लाविले ॥३८॥

गुरु गेला स्वस्थानासी ॥ नित्य लघुरुद्र होत शिवासी ॥ आम्ही आलो शिवदर्शनासी ॥ सर्व कन्या मिळोनिया ॥३९॥

तू आहेसी कोणाची कोण ॥ एकलीच आलीस कोठून ॥ हे आद्यंत वर्तमान ॥ सांग आता आम्हांते ॥४०॥

बकुला मनी हर्षयुक्त ॥ कन्याप्रती काय बोलत ॥ मी वेंकटेशाची दासी यथार्थ ॥ आले कार्यार्थ कल्पोनिया ॥४१॥

राजपत्‍नीचे दर्शन ॥ करवा आता मज कारण ॥ यावरी कन्या बोलती वचन ॥ बकुलेप्रती ते काळी ॥४२॥

कन्येसाठी यथार्थ ॥ धरणीदेवी असे दुःखित ॥ आता दर्शन नव्हे सत्य ॥ आत कोणासी न सोडिती ॥४३॥

तरी नगरींच्या कामिनी ॥ जातील पहावया लागूनी ॥ तयासंगे जावोनी ॥ दर्शन घेई माते तू ॥४४॥

ऐकोनिया ऐशी मात ॥ बकुला राहिली समय लक्षित ॥ इकडे वेंकटाद्रीसी जगन्नाथ ॥ कायकरिता जाहला ॥४५॥

मनी विचारा मधुकैटभारी ॥ बकुला गेली नारायणपुरी ॥ तिचेनि कार्य निर्धारी ॥ न साधेचि सर्वथा ॥४६॥

बकुला एकली निर्धार ॥ जैसा एकुलता नव्हे पुत्र ॥ एक नेत्र नव्हे साचार ॥ तैसा प्रकार जाहला हा ॥४७॥

बकुला केवळ स्त्रीपरिकर ॥ तिसी न कळे बोलण्याचा प्रकार ॥ माया वेषधारी मुरहर ॥ काय करिता जाहला ॥४८॥

विधीसी पाचारोनि झडकरी ॥ आज्ञा करी पूतनारी ॥ तू बाळक वेष निर्धारी ॥ होई आता अविलंबे ॥४९॥

आज्ञा वंदोनि विधाता ॥ बाळक जाहला अवचिता ॥ आपण पुलंदिनी वेष तत्वता ॥ नटला तेव्हा जगदात्मा ॥५०॥

स्त्रीवेष अवलंबून ॥ नेसला चीर वस्त्र मलिन ॥ फाटकीकंचुकी लेऊन ॥ अनुपम रूप धरियेले ॥५१॥

लंबोदरी लंबकर्णी ॥ लंबपयोधर दिसती दोनी ॥ गुंजमणीचे आभरणी ॥ सर्वांगी लेइली असे ॥५२॥

वेणुगुल्म मस्तकावरी ॥ त्यात नव धान्ये भरली निर्धारी ॥ लेकरू अत्यंत कृश अहोरात्री ॥ रुदन करी सर्वदा ॥५३॥

शिशु वोटीत बांधोन ॥ नाचत जात स्वच्छंदे करून ॥ नारायणपुरा लागून ॥ धर्मदेवी पातली ॥५४॥

नगरी सर्वस्त्रिया प्रती ॥ धर्मदेवी बोले निश्चिती ॥ जे इच्छित ज्याचे चित्ती ॥ पूर्ण करीन निर्धारी ॥५५॥

पुत्र बंधु आणि पती ॥ मत्प्रसादे होईल प्राप्ती ॥ भूत भविष्य वर्तमान स्थिती ॥ कळते निश्चिती मजलागी ॥५६॥

राहते नरनारायणाश्रमी ॥ कार्य प्रसंगे आले या ग्रामी ॥ तुमचे मनोरथ असतील ते मी ॥ पूर्ण करीन सर्वही ॥५७॥

ऐसी ऐकता वचनोक्ती ॥ स्त्रिया सर्व आश्चर्य करिती ॥ मग जावोनी शीघ्रगती ॥ राजस्त्रियेसी सांगितले ॥५८॥

नरनारायणाश्रमीहून ॥ धर्मदेवी आली जाण ॥ भूत भविष्य वर्तमान ॥ सर्वकळत तियेसी ॥५९॥

आणि जे इच्छा असेल मानसी ॥ पूर्ण करील निश्चयेसी ॥ ऐकोनिया निजमानसी ॥ धरणीदेवी हर्षली ॥६०॥

धरणी म्हणे तत्वता ॥ प्राणसख्या हो चला आता ॥ धर्मदेवी विलंब न करिता ॥ आणा यथार्थ मजपाशी ॥६१॥

ऐसे ऐकताचि वचन ॥ स्त्रिया धावल्या वेगेकरून ॥ धर्मदेवीप्रती वचन ॥ बोलत्या जाहल्या ते काळी ॥६२॥

स्त्रिया म्हणती शुभकल्याणे ॥ धर्मदेवी गुणसंपन्ने ॥ राजपत्‍नीने तुजलागून ॥ पाचारिले जननीये ॥६३॥

तिची कन्या पद्मावती ॥ व्याधिग्रस्त जाहली निश्चिती ॥ यालागी माते तुजप्रती पाचारिले सतीने ॥६४॥

धर्मदेवता बोले वचन ॥ मी केवळ दरिद्री दीन ॥ मलिनवस्त्र नेसले जाण ॥ गुंजाभूषण अंगावरी ॥६५॥

तेथे आलिया तत्वता ॥ मज विनोद करतील यथार्थ ॥ श्रीमंताचे घरासि सर्वथा ॥ दरिद्रियांनी न जावे ॥६६॥

हास्य करावया कारणे ॥ बोलाविली राजस्त्रियेने ॥ तेथे यावयाचे कारण ॥ नसे काही मजलागी ॥६७॥

मग स्त्रिया सर्व मिळोन ॥ धर्मदेवीसी बहुत प्रार्थून ॥ राजसदना लागून ॥ नेत्या झाल्या ते काळी ॥६८॥

धरणीदेवी येवोन ॥ धर्मदेवीसी करी वंदन ॥ म्हणे माते कृपाकरोन ॥ आलीस एथे दयार्णवे ॥६९॥

तू आहेस कोठील कोण ॥ हरिसी लोकांचे दुःख दारूण ॥ आलीस कोणत्या देशीहून ॥ शुभकल्याणे सांग मज ॥७०॥

येरी म्हणे नारायणाश्रमाहून ॥ मी आताचि पातले जाण ॥ साक्षात जो नारायण ॥ भ्रतार माझा निर्धारी ॥७१॥

त्याचे वीये हा पुत्र ॥ उत्पन्न जाहला निर्धार ॥ कार्यप्रसंगे आले साचार ॥ धर्मदेवी नाम माझे ॥७२॥

धरणी म्हणे हो जननी ॥ तू सद्‍गुणरत्नाची खाणी ॥ आलीस माय कृपाकरोनी ॥ संकट जाणोनि अविलंबे ॥७३॥

तरी माझी कन्यापरिकर ॥ पद्मावती नामे सुंदर ॥ व्याधिग्रस्त जाहली निर्धार ॥ सांग माते काय करू ॥७४॥

येरी बोले साचार ॥ माते मी बोलेन स्पष्ट उत्तर ॥ तुम्हांसी तो विषाद फार ॥ वाटेल तथा गोष्टीचा ॥७५॥

राजकांता बोले वचन ॥ माते तू न करी अनुमान ॥ अम्हावरी कृपाकरोन ॥ संकटवारी एवढे ॥७६॥

मग उत्तमासन देऊन ॥ बैसवि धर्मदेवीलागून ॥ देवी बोले मग हास्यवदन ॥ धरणी प्रती ते काळी ॥७७॥

म्हणे कल्याणे ऐक वचन ॥ तू करी वेगी मंगळस्नान ॥ शुभ्रकंचुकी शुभ्रवस्त्र नेसोन ॥ गुरुदेवतेसी नमस्कारी ॥७८॥

येरी तैसेची करोन ॥ पश्चिमाभिमुख बैसली येवोन ॥ म्हणे माते बोल वचन ॥ काय करू यावरी ॥७९॥

मग बोले पुलिंदिनी ॥ माते वायन देई त्वरे करोनी ॥ सुवर्णशूर्पी मौक्तिक भरोनी ॥ तंडुलयुक्त देइजे ॥८०॥

भक्तिपूर्वक असे वायन ॥ देई माते त्वरेकरून ॥ धरणी तत्काळ सिद्धकरोन ॥ वायन देती जाहली ॥८१॥

पुलंदिनी म्हणे माते ऐक ॥ क्षुधाक्रांत माझे बाळक ॥ रात्रंदिवस रडे देख ॥ देई उत्तम अन्नाते ॥८२॥

मग सुवर्ण पात्री क्षीरान्न ॥ तत्काळ आणिले निर्मून ॥ परी बाळक न भक्षी जाण ॥ मानुषी अन्न म्हणोनिया ॥८३॥

न भक्षूनिया अन्न ॥ रुदन करिता न राहे जाण ॥ पुलिंदिनी ऐसे देखोन ॥ करी ताडण बाळकाते ॥८४॥

म्हणे दरिद्री दुराचारी बाळ ॥ खाऊनि राहाणार कंदमूळ ॥ राजनिर्मित अन्न निर्मळ ॥ भक्षील कैसे निर्दैवी ॥८५॥

ऐसे बोलोनि बाळासी ॥ आपण भोजनकरी वेगेसी ॥ म्हणे मी भक्षिल्या बाळकासी ॥ हित सहजची होतसे ॥८६॥

असो जाहलिया भोजन ॥ बैसली स्वस्थ मने करून पूर्वाभिमुख बैसोन ॥ बाळ घेतले अंकावरी ॥८७॥

एकाग्र करोनिया मन ॥ चिंती दैवतालागून ॥ मायावेषधारी भगवान ॥ नानाचरित्र दावितसे ॥८८॥

जो साक्षात आदिनारायण ॥ ज्यासि वंदिती शक्र ईशान ॥ निज भक्त तारावया लागून ॥ कौतुक अगाधदावितसे ॥८९॥

असो आता पुलिंदिनी ॥ सर्वदेवीसी स्मरी मनी ॥ आदिनारायणासि चिंतुनी ॥ मग ध्यात लक्ष्मीते ॥९०॥

कमळोद्भव आणि सरस्वती ॥ चिंतिले ह्रदयी उमापती ॥ स्मरती जाहली गिरिजा सती ॥ इंद्रासि स्मरिले त्यावरी ॥९१॥

काशीविश्वेश्वर निर्मळ ॥ बिंदुमाधव स्मरिला तत्काळ ॥ विंध्यपादप्रयागादि सकळ ॥ गोदातीर वासियांते ॥९२॥

नारसिंह अहोबळ ॥ पांडुरंग पंपाधीश प्रबळ ॥ वेंकटाद्रि आणि श्रीशैल्य ॥ मल्लिकार्जुन स्मरियेले ॥९३॥

घटिताचळ वृथाचळ साचार ॥ स्मरिला मनी कालहस्तीश्वर ॥ श्रीरंग कुंभकोण शार्ङ्गधर ॥ सेतुरामेश्वर स्मरियेले ॥९४॥

सुब्रह्मण्य मधुसूदन शंकर ॥ चंद्रेश्वर गोकर्णेश्वर ॥ हरिहरेश्वर मनोहर ॥ स्मरिले साचार दैवते ॥९५॥

गंगा गोदावरी कृष्णा ॥ तुंगभद्रा मलापहरणा ॥ कावेरी कपिला सुवर्णमुखरी जाणा ॥ अनुक्रमे नद्यासर्व ॥९६॥

अंबिका आणि भैरव साचार ॥ कामाक्षी मीनाक्षी सुंदर ॥ करवीरवासिनी देवी परिकर ॥ स्मरोनि निर्भर जाहली ॥९७॥

मग आपुला जो भ्रतार ॥ बद्रिकाश्रमवासी साचार ॥ मातापिता आणि गुरुवर ॥ चिंतिती जाहली मानसी ॥९८॥

इतुकी दैवते चिंतून ॥ म्हणे आता सत्य बोलेन ॥ मुखशुद्धीसाठी त्वरेकरून ॥ तांबूल देई जननिये ॥९९॥

मग तांबुल त्रयोदशगुणी ॥ आणोनि दिधला राजपत्‍नी ॥ येरी तो भक्षणकरोनी ॥ बोलती जाहली यावरी ॥१००॥

म्हणे नृपवल्लभे ऐक आता ॥ तुझिया कन्येची व्यवस्था ॥ सखिया समवेत तुझी दुहिता ॥ उपवनासि गेली होती ॥१॥

तेथे सर्व कन्यामिळोन ॥ पुष्पे तोडिती प्रीतीकरून ॥ स्वच्छंदे करिती गायन ॥ विनोद भाषण करिताती ॥२॥

ऐसे आनंदे क्रीडता ॥ एक पुरुष आला अवचिता ॥ अश्व रूढ त्याचे स्वरूप पाहता ॥ कोटिकाम वोवाळिजे ॥३॥

मृगमदाहूनि विशेष ॥ त्याचे अंगीचा सुटला सुवास ॥ मुखमृगांक राजस ॥ नीलजीमूत वर्ण जो ॥४॥

आकर्णविराजती राजीवनयन ॥ कस्तूरीटिळक विराजमान ॥ मुकुटमंडले शोभायमान ॥ कौस्तुभगळा विलसतसे ॥५॥

सुरंग नेसला पीतांबर ॥ वैजयंतीमाळा परिकर ॥ ज्याचे तेजी चंद्र दिवाकर ॥ झाकोळती पाहता ॥६॥

ऐसा एक सुंदर पुरुष ॥ अकस्मात आला त्या वनास ॥ तन्मय जाहले मानस ॥ सख्यांसहित इयेचे ॥७॥

देखता त्याचा वदनचंद्र ॥ जाहले इचे नयन चकोर ॥ देहभान विसरली समग्र ॥ अंगी विहर दाटला ॥८॥

मग सखियांसी दावी खूण ॥ पुसा कोण कोठील वर्तमान ॥ सखिया पुसती त्यालागून ॥ तव तो जवळी पातला ॥९॥

आपुला वृत्तांत वेगेसी ॥ सांगितला पद्मावतीपाशी ॥ हिने आपुला वृत्तांत त्यासी ॥ सर्वही कथिला जननिये ॥११०॥

मग तो पुरुष विरहग्रस्त ॥ इयेसि बोलिला मदनयुक्त ॥ ही होऊनी क्रोधयुक्त ॥ सखियांसहित निघाली ॥११॥

सर्वकन्या मिळोन ॥ त्यावरी वर्षल्या पाषाण ॥ त्या घाते करोन ॥ अश्व त्याचा भंगला ॥१२॥

मग तो पुरुष म्लानवदन ॥ गेला उत्तर दिशा लक्षून ॥ परी इच्या मनी संपूर्ण ॥ ध्यास त्याचा लागला ॥१३॥

म्हणे त्या सारखा संदर ॥ पुरुष नसे पृथ्वीवर ॥ मनात दाटला पंचशर ॥ विव्हळ शरीर जाहले ॥१४॥

मनी वाटे परम खंती ॥ कैतो पुरुष देखेन पुढती ॥ विरहानळ जाळी तीप्रती ॥ आणि काही नसेची ॥१५॥

भुतबाधा नाही तियेस ग्रहबाधा नाही निःशेष ॥ विरहज्वरे व्यापिले मानस ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥१६॥

तो पुरुष म्हणसील कोण ॥ साक्षात वैकुंठपति रमारमण ॥ श्रीवेंकटेश नामाभिधान ॥ शेषाचळ निवासी जो ॥१७॥

सत्य की मिथ्या वर्तमान ॥ पूस तू आपुले कन्येलागून ॥ धरणी देवी तात्काळ उठोन ॥ कन्येपाशी पातली ॥१८॥

तव ती नेत्रे झाकून ॥ पडिली होऊनि निचेतन ॥ मातेने सावध करून ॥ निजांकावरी घेतली ॥१९॥

माता म्हणे कुमारी ॥ मजसी बोल क्षणभरी ॥ राजीव नेत्रे झडकरी ॥ उघडोनि पाहे मजकडे ॥१२०॥

मग ती नेत्रे उघडोन ॥ मातेकडे पाहे अवलोकून ॥ माता म्हणे वर्तमान ॥ सत्य सांग सुकुमारे ॥२१॥

भय लज्जा मनी धरोन ॥ सांगावया न करी अनुमान ॥ तुज असे माझी आण ॥ वृत्तांत सर्व सांगपा ॥२२॥

कन्या म्हणे ऐक माते ॥ मी गेले होते उपवनाते ॥ सखियांसहित क्रीडता तेथे ॥ एक अपूर्व वर्तले ॥२३॥

हयारूढ पुरुष एक ॥ अकस्मात पातला देख ॥ पाहता त्याचा मुखमृगांक ॥ त्रिभुवनामाजी दुजा नसे ॥२४॥

मदनमोहन चारुगात्र ॥ आकर्णनयन सुहास्य वक्र ॥ चतुर्भुज शामसुंदर ॥ निमासुर डोळस ॥२५॥

कोट्यानकोटी मीनकेतन ॥ कुरवंडी करावे नखावरून ॥ त्याचे सौंदर्य वर्णावया लागून ॥ सहस्त्रवदन शक्त नव्हे ॥२६॥

त्याचा पाहोनी वदनचंद्र ॥ मजला दाटला पंचशर ॥ तो जरी होईल भ्रतार ॥ तरीच धन्य होईन मी ॥२७॥

ऐसा वृत्तांत सांगोन ॥ नेत्र झाकिले मागुतेन ॥ मग धरणीदेवी येऊन ॥ पुलंदिनी प्रती बोलतसे ॥२८॥

म्हणे देवी तुझे सत्य वचन ॥ ऐसियासी काय करू प्रयत्न ॥ धर्मा म्हणे सत्य बोलेन ॥ तुज ते विषम वाटेल ॥२९॥

धरणी म्हणे बोल पूर्ण ॥ सांगसी ते आता करीन ॥ धर्मा म्हणे वेंकटेशालागून ॥ करी अर्पण कन्या ही ॥१३०॥

वेंकटेशाकडून ॥ एथे आली एक कामिन ॥ वरानने तुज लागून ॥ भेटेल येवोनी तत्वता ॥३१॥

कन्या त्यासी देतो म्हणोन ॥ संकल्प करी वेगेकरून ॥ आताचि होईल सावधान ॥ धरणीदेवी कन्या तुझी ॥३२॥

जरी अनुमान करशील आता ॥ तरी न वाचे कन्या जाण तत्वता ॥ धरणी दचकली ऐकता ॥ म्हणे ऐसे सर्वथा बोलू नको ॥३३॥

तू सांगसी तैसे करीन ॥ बोलू नको असह्यवचन ॥ मग राजया पाशी वर्तमान ॥ धरणीदेवी श्रुतकरी ॥३४॥

आकाशराजा बंधूसहित ॥ कन्येपाशी पातला त्वरित ॥ आद्यंत अवघा वृत्तांत ॥ कळविला तेव्हा राजयाते ॥३५॥

राजा बोले वचन ॥ वेंकटेश हा कोणाचा कोण ॥ कोण याती कोण वर्ण ॥ राहते स्थळ कोणते ॥३६॥

गोत्र ग्राम न कळे जरी ॥ कन्या अर्पावी कवणेपरी ॥ आणि त्याकडोनी आजिवरी ॥ कोणी आले नाहीत पै ॥३७॥

धरणी बोले प्रिया लागून ॥ वेंकटेशाकडून एककामिन ॥ एथे आली म्हणोन ॥ धर्मदेवी सांगितले ॥३८॥

तिने सांगितले पाही ॥ प्रत्ययासी आले सर्वही ॥ मग ती धर्मा लवलाही ॥ स्वस्थानासी पावली ॥३९॥

ऐसे बोलता परस्परे ॥ सायंकाळ जाहला निर्धार ॥ शिवाभिषेक सारोनि विप्र ॥ प्रसाद घेऊनी पातले ॥१४०॥

प्रसाद घेऊनी नृपनाथ ॥ भोजन केले विप्रांसहित ॥ दक्षिणा देवोनी अमित ॥ बोळविले ब्राह्मणांसी ॥४१॥

तो नगरींच्या कामिनी ॥ पद्मावतीच्या सांगातिणी ॥ त्याही पहावया लागूनी ॥ येत्या जाहल्या साक्षेपे ॥४२॥

त्यासवे बकुलासुंदरी ॥ येती जाहली राजमंदिरी ॥ धरणीपाशी निर्धारी ॥ सर्वस्त्रिया पातल्या ॥४३॥

पद्मावतीसी पाहूनी ॥ बैसल्या हो अवघ्या जणी ॥ बकुलेप्रती बोले वचन ॥ राजपत्नी ते काळी ॥४४॥

म्हणे बाई कोठील कोण ॥ येणे जाहले काय कारण ॥ या वरी बकुला हास्यवदन ॥ राजपत्निसी बोलतसे ॥४५॥

म्हणे मी कन्यार्थी निश्चयेसी ॥ आहे वेंकटेशाची दासी ॥ वेंकटाद्रीहूनि वेगेसी ॥ आले माते तव दर्शना ॥४६॥

धरणी बोले वचन ॥ वेंकटेश हा कोणाचा कोण ॥ कोणदेश कोणस्थान ॥ जनक जननी कोण त्याचे ॥४७॥

कवण वंश कवण गोत्र ॥ सांग माते सविस्तर ॥ यावरी बकुलासुहास्य वक्र ॥ बोलती काय जाहली ॥४८॥

सोमवंशी जन्मला तत्वता ॥ देवकीमाता वसुदेवपिता ॥ नाम त्याचे श्रीकृष्णनाथ ॥ यादवकुळी अवतरला ॥४९॥

वसिष्ठगोत्री उत्पन्न ॥ श्रवण नक्षत्र परिपूर्ण ॥ वयरूपयौवन ॥ सर्वगुणे अलंकृत ॥१५०॥

विद्यावंत आणि कुशळ ॥ द्रव्यवान पराक्रमी सबळ ॥ शोधिता हे पृथ्वीमंडळ ॥ ऐसा दुसरा नसेची ॥५१॥

यावरी धरणी बोलत ॥ जरी ऐसा असेल लक्षणयुक्त ॥ तरी आजवरी किनिमित्त ॥ विवाह याचा न जाहला ॥५२॥

बकुला ह्मणे ऐक माते ॥ लग्न जाहले असे निश्चित ॥ परी संततीलागी यथार्थ ॥ दुसरा विवाह करितसे ॥५३॥

ऐकताचि ऐसी मात ॥ गुंतले धरणीचे चित्त ॥ मग रायापाशी वृत्तांत ॥ समूळ कथिती जाहली ॥५४॥

म्हणे हे नृपचक्रचूडामणी ॥ वेंकटेशाकडूनी एक कामिनी ॥ कन्यार्थी आली आमचे भुवनी ॥ वार्ता ऐकली तिच्यामुखे ॥५५॥

विद्या वय आणि सुंदर ॥ सभाग्य पराक्रमी आणि उदार ॥ वेंकटेशासारिखा वर ॥ पृथ्वीवरी दुजा नसे ॥५६॥

ऐसा गुणाढ्य असेल जरी ॥ स्वामी त्याचा शोध घ्यावा झडकरी ॥ धर्मदेवीचे सांगणे निर्धारी ॥ हेचि असे प्राणेश्वरा ॥५७॥

आणि कन्येचे मनी निर्धार ॥ वेंकटेशचि पाहिजे वर ॥ त्याचेचि विरहे साचार ॥ व्यथा थोर जाहली ॥५८॥

कन्या वाचली मरता मरता ॥ काय पाहता प्राण नाथा ॥ वेंकटेशाचे नाम घेता ॥ सावध जाहली पद्मावती ॥५९॥

ऐकोनि कांतेचे वचन ॥ राजा जाहला आनंदघन ॥ तोंडमान आणि वसुदान ॥ बंधु पुत्रांसी बोलाविले ॥१६०॥

बंधु पुत्र प्रधान सहित ॥ विचार करी नृपनाथ ॥ आपला कुलगुरु अंगिरासुत ॥ तयालागी पाचारिले ॥६१॥

देवाचार्य पातला वेगेसी ॥ राजा साष्टांग नमूनी त्यासी ॥ सिंहासनी बैसवोनी निश्चयेसी ॥ षोडशोपचारे पूजिले ॥६२॥

कर जोडोनी राजेश्वर ॥ गुरुसि विनवी वारंवार ॥ म्हणे गुरुवर्या ऐकसार ॥ वर्तमान आद्यंत ॥६३॥

व्यथाभूत होवोनी ॥ कन्या निजली असता शयनी ॥ पुलंदिनी ब्रदिकाश्रमाहूनी ॥ आली एथे गुरुवर्या ॥६४॥

पद्मावतीचा वृत्तांत ॥ तिणे कथिला हो समस्त ॥ उपवनी क्रीडता अकस्मात ॥ पुरुष एक पातला ॥६५॥

नीलजीमूत वर्ण सुकुमार ॥ चतुर्भुज शंखचक्रधर ॥ त्याचे सौंदर्य पाहता विचित्र ॥ कन्येसी विरह दाटला ॥६६॥

तो पुरुष म्हणाल कोण ॥ तरी साक्षात इंदिरारमण ॥ त्यासी पद्मावती गुणनिधान ॥ सर्वभावे अर्पावी ॥६७॥

जरी कराल अनुमान ॥ कन्या न वाचे निश्चयवचन ॥ दृढ संकल्प कराल पूर्ण ॥ तरी गुण येईल आतांची ॥६८॥

ऐसे बोलोनि पुलिदिनी ॥ गेली आपुल्या स्वस्थानी ॥ कन्येसि विचारिता एकांतस्थानी ॥ तिनेहि तेचि कथियेले ॥६९॥

वेंकटेशाचे रूप पाहोन ॥ तेथेचि गुंतले माझे मन ॥ दुसरा वर त्या वाचोन ॥ सर्वथाही न वरीच ॥१७०॥

ऐसा कन्येचा निर्धार ॥ परी वेंकटेश हा कोणपरिकर ॥ काय त्याचे कुळगोत्र ॥ ठाऊक नसे आम्हाते ॥७१॥

यालागी गुरुवर्या अवधारी ॥ तुम्हांसी सर्व श्रुत असेल जरी ॥ कोण कोठील निर्धारी ॥ आम्हा लागी सांगावे ॥७२॥

यावरी बोले वाचस्पती ॥ वेंकटेश हा वैकुंठपती ॥ आम्ही जाणतो त्याप्रती ॥ परी नवल चित्ती वाटतसे ॥७३॥

जो अज अजित निर्विकार ॥ मायानियंता परमेश्वर ॥ तुझ्या कन्येलागी निर्धार ॥ तो वर कैसा जोडेल ॥७४॥

ज्याचे नाम घेता साचार ॥ शीतळ जाहला अपर्णावर ॥ तो तुझ्या कन्येसी जोडला वर ॥ हेचि आश्चर्य वाटतसे ॥७५॥

जो सर्गस्थित्यंतकारण ॥ जो इंद्राचा इंद्र नारायण ॥ वेदशास्त्रे भांडती ज्या कारण ॥ तो वर कैसा मिळाला ॥७६॥

ज्याचे दर्शनालागी निश्चिती ॥ किती एक पंचाग्निसाधने करिती ॥ नानातपे आचरती ॥ परी तयालागी नातळे तो ॥७७॥

तुझ्या कन्येसाठी पूर्ण ॥ तो कैसा आला वैकुंठाहून ॥ नवल वाटते मजलागून ॥ तरी एक सांगतो ऐक राया ॥७८॥

शुक्राचार्या नामे विख्यात ॥ योगिराज वेदव्याससुत ॥ ज्याने षड्‌वैरी जिंकिले निश्चित्त ॥ इंद्रियजित महाराज ॥७९॥

एथोनी पंचक्रोशा वरती ॥ काननी असे त्याची वस्ती ॥ वेंकटेशाची प्रीती ॥ त्यावरी असे अत्यंत ॥१८०॥

त्यासी बोलोवोनि नृपवरा ॥ आद्यंत वार्ता श्रवणकरा ॥ ऐसे ऐकतांचि नृपवरा ॥ बंधूप्रती आज्ञापिले ॥८१॥

म्हणे आताचि रथ घेऊन ॥ तुवा जावे त्वरे करोन ॥ शुकयोगींद्रासी प्रार्थून ॥ घेवोनि येई झडकरी ॥८२॥

आज्ञा वंदोनी तोंडमान ॥ तात्काळ चालिला रथ घेऊन ॥ शुकाश्रमासमीप येवोन ॥ लोटांगण घालितसे ॥८३॥

तोंडमानासी पाहोनि सहज ॥ धावला तो योगिराज ॥ आलिंगन देवोनि तेजःपुंज ॥ वर्तमान पुसतसे ॥८४॥

म्हणे काय कारण कल्पून ॥ जाहले तुमचे आगमन ॥ येरी म्हणे नृप तुम्हालागून ॥ पाचारिले स्वामिया ॥८५॥

पद्मावती नाम कन्येसी ॥ देऊ पाहती वेंकटेशासी ॥ त्याची वार्ता काय कैसी ॥ पुसावयासी बोलाविले ॥८६॥

ऐसे ऐकता वर्तमान ॥ आनंदे दाटला व्यासनंदन ॥ नाचो लागला संपूर्ण ॥ हर्ष न माये गगनोदरी ॥८७॥

कमंडलु टाकीला फोडून ॥ कृष्णाजिन टाकिले फाडून ॥ चिद्धनानंदे परिपूर्ण ॥ शुक योगींद्र नाचतसे ॥८८॥

शुकाचे मनी हाचि भाव ॥ कि माझा वेंकटेश दयार्णव ॥ याचा विवाह होईल अपूर्व ॥ म्हणोनिया नाचतसे ॥८९॥

असो रथी बैसोनी सत्वर ॥ पावले वेगी नारायणपुर ॥ सभा घनवटली साचार ॥ तेथेचि रहंवर नेला पै ॥१९०॥

शुक योगींद्र देखतांची दृष्टी ॥ रायाचे हर्ष न माये पोटी ॥ धावोनिया उठाउठी ॥ चरणी मिठी घातली ॥९१॥

योगींद्रासी करी धरोनी ॥ बैसविले दिव्य सिंहासनी ॥ अर्घ्यपाद्यादि उपवारे करूनी ॥ षोडशोपचारे पूजिले ॥९२॥

पुढे उभा कर जोडून ॥ म्हणे महाराज तू आनंदघन ॥ अतींद्रिय दृष्टांत परिपूर्ण ॥ मुकुटरत्न योगियांचा ॥९३॥

माझी कन्या पद्मावती ॥ ती द्यावी वेंकटेशा प्रती ॥ परी कैसी आहे त्याची स्थिती ॥ ते आम्हाप्रती कळेना ॥९४॥

यालागी योगींद्रा अवधारी ॥ कृपा करोनिया मजवरी ॥ वेंकटेश हा कोण निर्धारी ॥ श्रुत करी स्वामिया ॥९५॥

यावरी शुक बोले हासोन ॥ म्हणे राया भाग्य तुझे परिपूर्ण ॥ उंच असे मेरूहून ॥ तरी जामात ऐसा जोडला ॥९६॥

निर्धनासी सापडे धन ॥ की जन्मांधासी आले लोचन ॥ की क्षुधार्थी जो दीन ॥ क्षीराब्धि त्यासि मिळाला ॥९७॥

की मर्त्याच्या मुखात ॥ पीयूष पडिले अकस्मात ॥ की चिंताग्रस्तासि निश्चित ॥ चिंतामणि मिळाला ॥९८॥

तैसे जाहले तुजप्रती ॥ तो जगदात्मा वैकुंठपती ॥ अनायासे तुज नृपती ॥ जामात जोडला निर्धारी ॥९९॥

ज्याकारणे करिती महायज्ञ ॥ देह कर्वती घालिती जाण ॥ अथवा सेविती घोरारण्य ॥ त्यासी नारायण न मिळेची ॥२००॥

तू मानव नृपवर ॥ तुज प्राप्त जाहला इंदिरावर ॥ जैसे कूप स्नानासि जाता नर ॥ तो प्रयागराज भेटला ॥१॥

ऐसे बोलता शुकयोगींद्र ॥ आनंदला आकाश नृपवर ॥ म्हणे नाडी कूटसमग्र ॥ मिळे कैसे पाहावे ॥२॥

पुसिले बकुलेसी सत्वर ॥ वेंकटेशाचे कोणते नक्षत्र ॥ ऐकता तिसी निर्धार ॥ क्रोध आला किंचित ॥३॥

शुकादिक सांगता ॥ अद्यपि संशय न फिटे सर्वथा ॥ ऐसे तिचे मनोगत ॥ व्याससुते जाणीतले ॥४॥

मग शुकाचार्य बोलत ॥ क्रोधयावया किंनिमित्त ॥ यथार्थ सांगावे निश्चित ॥ काहि अनुमान न करिता ॥५॥

ऐसे बोलता व्याससूनु ॥ बकुला पुन्हा बोले पूर्ण ॥ वेंकटेशाचे नक्षत्र श्रवण ॥ पूर्वीच म्या सांगितले ॥६॥

यावरी बोले भूपती ॥ मृग नक्षत्र कन्येचे निश्चिती ॥ मग देवगुरु बृहस्पती ॥ पाहता जाहला विचारूनी ॥७॥

तो मिळोनि आले छत्तिसगुण ॥ राजा आनंदला परिपूर्ण ॥ म्हणे माझे अगाध पूर्वपुण्य ॥ फळा आले एकदाची ॥८॥

सभेमाजी सर्वासमीप ॥ राजा करी दृढ संकल्प ॥ म्हणे श्रीनिवास वैकुंठाधिप ॥ त्यासी कन्या दिधली ॥९॥

ऐसे बोलता नृपवर ॥ जाहला एकचि जयजयकार ॥ वाद्ये वाजती अपार ॥ सुमने सुरवर वर्षती ॥२१०॥

आनंद जाहला एकसरा ॥ रथ भरोनि वाटिती शर्करा ॥ धरणीदेवीसी अपार ॥ आनंदपूर दाटला ॥११॥

यावरी तो नृपनाथ ॥ शुकाचार्यांप्रती बोलत ॥ म्हणे स्वामी माझ्या मनात ॥ शंका एक वाटतसे ॥१२॥

आम्ही केले घटितार्थ ॥ परि कळविले नाही वेंकटेशाते ॥ तो देवाधिदेव समर्थ ॥ मान्य करील की स्वामिया ॥१३॥

मग बोले बादरायणी ॥ म्हणे राया चिंता न करी मनी ॥ तुवा पत्र एक लिहूनी ॥ देई वेगे मजपाशी ॥१४॥

मी आताचि जाऊन ॥ भेटतो वेंकटेशालागून ॥ पत्राचे उत्तर घेऊन ॥ येतो आता झडकरी ॥१५॥

ऐकता संतोषला भूपाळ ॥ दिव्य पत्र लिहिता तत्काळ ॥ अभिप्राय लिहिला तो सकळ ॥ श्रोते सावकाश परिसिजे ॥१६॥

चिरंजीव विजयी श्रीजगन्मोहना ॥ श्रीवेंकटेशा रमारमणा ॥ शेषाद्रिवासा वैकुंठराणा ॥ वेदपुराणा वंद्य तू ॥१७॥

नारायणपुराहून ॥ आकाशराव करी आशिर्वचन ॥ आजिवरी क्षेम कल्याण ॥ तुझ्याकृपे असो आम्ही ॥१८॥

तू अज अव्यय देवाधिदेव ॥ ऐक माझ्या मनींचा भाव ॥ माझी कन्या पद्मसंभव ॥ ते तुजलागी अर्पिली ॥१९॥

सच्चिदानंद नारायणा ॥ मना आणी माझी प्रार्थना ॥ अंगीकारोनी कन्यारत्‍न ॥ मनोरथ पूर्ण करी माझे ॥२२०॥

वैशाखशुद्ध दशमीसी ॥ भृगुवारी नेमिले लग्नासी ॥ सह परिवारे त्या संधीसी ॥ लग्ना कारणे येईजे ॥२१॥

जगन्निवासा कृपाकरून ॥ पूर्ण करी एवढे कारण ॥ आणि आद्यन्तवर्तमान ॥ शुक योगींद्र सांगेल ॥२२॥

मुख्य असे एवढे कारण ॥ आणिक नसे विशेष लिहिणे ॥ तू जगन्निवास नारायण ॥ पत्रोत्तर देईजे ॥२३॥

ऐसे लिहोनि झडकरी ॥ दीधले शुकाचार्याचे करि ॥ म्हणे स्वामी निघा लौकरी ॥ वेंकटाद्रिसी जाईजे ॥२४॥

नानायुक्ती बोलून ॥ वश्यकरावा मधुसूदन ॥ कार्यसिद्धि होय पूर्ण ॥ ऐसे करी मुनिराया ॥२५॥

वरदक्षिणेसी साचार ॥ अर्बुद द्रव्य देईन निर्धार ॥ करोनिया नाना प्रकार ॥ कार्यसिद्धी करावी ॥२६॥

पत्र घेवोनि वेगेसी ॥ शुक आला वेंकटाद्रीसी ॥ बकुला पुसोनि धरणी देवीसी ॥ तीही निघालि त्वरेने ॥२७॥

आता शुकाचार्यालागून ॥ भेटेल इंदिरामनमोहन ॥ पुढील अध्यायी निरूपण ॥ श्रोते सावकाश परिसिजे ॥२८॥

वेंकटेशविजय हे वैकुंठगिरी ॥ जो का श्रवणपठणावर्तन करी ॥ त्याचे दुष्कर्म तोडोनि श्रीहरी ॥ निष्पाप करी सर्वदा ॥२९॥

भक्तवत्सला शुभदायका ॥ वीरवरदा वैकुंठनायका ॥ तुझी लीला भक्तपाळका ॥ ब्रह्मादिका कळेची ॥३०॥

वेंकटेशविजयग्रंथसुंदर ॥ संमत पुराणभविष्योत्तर ॥ श्रवण करोत भक्तचतुर ॥ सप्तमाध्याय गोडहा ॥२३१॥७॥

एकंदर ओवी संख्या ॥११३९॥