श्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


भक्तवत्सलता - अभंग २२४१ ते २२६४

२२४१

जे जे वेळें जें जें लागे । तें न मागतां पुरवी वेगें ॥१॥

ऐसा भक्तांचा अंकित । राहे द्वारीं पैं तिष्ठत ॥२॥

आवडी गौळियांची मोठी । गायी राखी जगजेठी ॥३॥

भक्ति भावार्थें भुकेला । एका जनार्दनीं विकला ॥४॥

२२४२

भक्ता जैसा मनोरथ । पुरवी समर्थ गुरुराव ॥१॥

नित्य ध्यातां तयाचे चरण । करी संसारा खंडन ॥२॥

वानूं चरणांची पवित्रता । उद्धार जडजीवां तत्वतां ॥३॥

अवचट लागतांचि कर । एका जनार्दनीं उद्धार ॥४॥

२२४३

आम्हां सकळां देखतां । पुरवी लळे तो सर्वथा ॥१॥

जें जें मागावें तयासीं । तें तें देतो निजभक्तांसीं ॥२॥

न मने अंकिताचा शीण । राहे द्वारपाळ होऊन ॥३॥

घोडे धूतले रणांगणीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥

२२४४

अंकित भक्ताचा । नीच काम करी साचा ॥१॥

काढी धर्माघरीं । उच्छिष्ट पात्रें निर्धारीं ॥२॥

कुब्जेसी रतला । एका जनार्दनीं भला ॥३॥

२२४५

भक्ताचिये काजें । देव करितां न लाजेक ॥१॥

हा तो पहा अनुभव । उदार पंढरीचा राव ॥२॥

न विचारी यातीकुळ । शुची अथवा चांडाळ ॥३॥

एका जनार्दनीं शरण । एका भावें निंबलोण ॥४॥

२२४६

भक्ताचिया घरीं । नीच काम देव करी ॥१॥

धर्माघरीं उच्छिष्ट काढी । अर्जुनाची धुतो घोडीं ॥२॥

विदुराच्या भक्षी कण्या । द्रौपदीधांवण्या धांवतु ॥३॥

एका जनार्दनीं शरण । एकपणें जनार्दन ॥४॥

२२४७

अंकित अंकिला । देव भक्तांचा पैं जाला ॥१॥

पहा पुंडलीकासाठी । उभा असें वाळूवंटीं ॥२॥

युगें अठ्ठावीस जालीं । न बैसें अद्यापि तो खालीं ॥३॥

न बैसोनि उभा असे । एका जनार्दनीं भक्तिपिसें ॥४॥

२२४८

भक्त अर्पितां सुमनमाळा । घाली आवडीनें गळां ॥१॥

ऐसा आवडीचा भुकाळू । श्रीविठ्ठल दीनदयाळु ॥२॥

भक्तें भावार्थें अर्पितां । तें आवडे पंढरीनाथा ॥३॥

भक्तासाठीं विटेवर । समपद कटीं करक ॥४॥

ऐशी कृपेची कोंवळी । एक जनार्दनीं माउली ॥५॥

२२४९

पार नाहीं जयाच्या गुणा । तो उभा श्रीपंढरीचा राणा ॥१॥

नवल गे माय भक्ताचेसाठीं । कटीं कर ठेवुनी उभा वाळुवंटीं ॥२॥

न म्हणे तया कोणते बोल । उगा राहिला न बोले बोल ॥३॥

एका जनार्दनीं भक्तांची आस । धरुनी उभा तिष्ठे जगदीश ॥४॥

२२५०

कृपाळुपणें उभा विटेवरी । पाहे अवलोकोनी दृष्टीभरी ॥१॥

न पुरेचि धणी न बैसे खालीं । उभा राहे समचि पाउलीं ॥२॥

युगें जाहलीं नोहे लेखा । एका जनार्दनीं भुलला देखा ॥३॥

२२५१

भोळा देव भोळा देव । उंच नीच नेणें भाव ॥१॥

चोखियाच्या मागें धांवे । शेलें कबिराचे विणावे ॥२॥

खुरपुं लागे सांवत्यासी । उणे येवो नेदी कोणासी ॥३॥

विष पिणेंक धाउनी जाणें । भाविकाची भाजी खाणें ॥४॥

कवण्याची तो आवडी मोठी । एकाजनार्दनीं लाळ घोटी ॥५॥

२२५२

भक्तदशनें देव ते तोषती । तेणें आनंद चित्तीं देवाचिये ॥१॥

भक्ताची स्तुति देवासी आनंद । भक्तानिंदा होतां देवा येतसे क्रोध ॥२॥

भक्त संतोषतां देवासी सुख । एका जनार्दानीं देवा भक्तांचा संतोष ॥३॥

२२५३

देव पुजिती आपुले भक्ता । मज वाढविलें म्हणे उचिता ॥१॥

ऐसा मानीं उपकार । देव भक्ति केला थोर ॥२॥

देवाअंगीं नाहीं बळ । भक्त भक्तीनें सबळ ॥३॥

देव एक देशीं वसे । भक्त नांदतीं समरसें ॥४॥

भक्तांची देवा आवडी । उणें पडों नेदी अर्ध घडी ॥५॥

नाहीं लाज अभिमान देवा । एका जनार्दनीं करी सेवा ॥६॥

२२५४

भक्त नीच म्हणोनि उपहासिती । त्यांचे पूर्वज नरका जाती ॥१॥

भक्त समर्थ समर्थ । स्वयें बोले वैकुंठनाथ ॥२॥

भक्तासाठीं अवतार । मत्स्य कूर्मादि सुकर ॥३॥

यातिकुळ न पाहे मनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥

२२५५

अभेद भजनाचा हरीख । देव भक्ता जाहले एक ॥१॥

कोठें न दिसे भेदवाणी । अवघी कहाणी बुडाली ॥२॥

हरपलें देवभक्तपण । जनीं जाहला जनार्दन ॥३॥

देवभक्त नाहीं मात । मुळींच खुंटला शब्दार्थ ॥४॥

एका जनार्दनीं देव । पुढें उभा स्वयमेव ॥५॥

२२५६

देव भक्तपणें नाहीं दुजा भाव । एकरुप ठाव दोहीं अंगीं ॥१॥

दुजेपण नाहीं दुजेपण नाहीं । दुजेपण नाहीं दोहीं अंगीं ॥२॥

एका जनार्दनीं देव तेचि भक्त । सब्राह्म नांदत एकरुपीं ॥३॥

२२५७

देव आणि भक्ति एकचि विचार । दुजे पाहे तयां घडे पातक साचार ॥१॥

देव आणि श्रुति सांगती पुराणें । देव आणि भक्त एकरुपपणें ॥२॥

एका जनार्दनीं जया समता दृष्टी । भक्ता पाहतां देवा होतसें भेटी ॥३॥

२२५८

भक्ताविण देवा । कैंचें एकपण सेवा ॥१॥

भक्तांची सेवा देव करी । देव तिष्ठे भक्त द्वारें ॥२॥

भक्तांचे अंकित । लक्ष्मीसह देव होत ॥३॥

एका जनार्दनीं भक्त । देवा हृदयीं धरीत ॥४॥

२२५९

जेथें जेथें भक्त वसे । तेथें देव नांदे अपैसें ॥१॥

हाचि पहा अनुभव । नका ठाव चळूं देऊं ॥२॥

बैसले ठायीं दृढ बैसा । वाचे सहसा विठ्ठल ॥३॥

एका जनार्दनीं ठाव । धरितां देव हातीं लागे ॥४॥

२२६०

वचन मात्रासाठी । पगटला कोरडे काष्ठीं ॥१॥

ऐसी कृपाळु माउली । भक्तासाठीं धांव घाली ॥२॥

कृपेची कोंवळा । राखे भक्तांचा तो लळा ॥३॥

एका जनार्दनीं डोळा । पहा विठ्ठल सांवळा ॥४॥

२२६१

भक्ताची अणुमात्र व्यथा । न सहावे भगवंता ॥१॥

अंबऋषीसाठीं । गर्भवास येत पोटीं ॥२॥

प्रल्हादाकरणें । सहस्त्र स्तंभी गुरगुरणें ॥३॥

गोपाळ राखिलें वनांतरीं । तेथें उचलिला गिरी ॥४॥

राखिले पांडव जोहरीं । काढिलें बाहेरी विवरद्वारें ॥५॥

ऐसा भक्ताचा अंकित । एका जनार्दनीं तया ध्यात ॥६॥

२२६२

देव दासाचा अंकित । म्हणोनि गर्भवास घेत ॥१॥

उणें पडों नेदी भक्ता । त्याची स्वयें वाहे चिंता ॥२॥

अर्जुनासाठी वरी । स्वयें शस्त्र घेत करें ॥३॥

प्रल्हादाकारणें । स्तंभामाजी गुरगरणें ॥४॥

बळिया द्वारीं आपण । रुप धरीं गोजिरें सगुण ॥५॥

ऐसा अंकित भावाचा । एका जनार्दनीं साचा ॥६॥

२२६३

शरणागता नुपेक्षी हरी । ऐसी चराचरीं कीर्ति ज्याची ॥१॥

बिभीषणें नमस्कार केला । राज्यदह्र केला श्रीरामें ॥२॥

उपमन्या दुधाचा पैं छंद । क्षीरसागर गोविंद त्या देतु ॥३॥

ध्रुव बैसविला अढळपदीं । गणिका बैसली मोक्षपदीं ॥४॥

ऐसी कृपेची साउली । एका जनार्दनीं माउली ॥५॥

२२६४

होउनी भक्तांचा अंकिला । पुरवितसे मनोरथ । ऐसी हे प्रचीत । उघड पहा ॥१॥

देव भक्ताचा अंकिला । धांवे आपण वहिला । भक्ताचिया बोला । उणें पडों नेदी ॥२॥

उपमन्यूचिया काजासाठी । क्षीरसिंधु भरुनि वाटी । लाविली त्याचे होटीं । आपुला म्हणोनी ॥३॥

वनीं एकटें ध्रुवबाळ । तयासी होउनी कृपाळ । दिधलें पद अढळ । आपुलिया लाजा ॥४॥

प्रल्हाद पडतां सांकडीं । खांबांतुन घाली उडी । दैत्य मारी कडोविकडी । आपुलिया चाडा ॥५॥

पडतां संकट पांडवासी । जाहला सारथी धुरेसी । मारविली बापुडी कैसा । कौरवें सहकुळ ॥६॥

ऐसा भक्ताचिया काजा । धांवें न धरत लाजा । एका जनार्दना दुजा । एकपणें एकटु ॥७॥