श्रीसंतएकनाथ गाथा - भाग दुसरा

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


आत्मस्थिति - अभंग २०२१ ते २०४०

२०२१

भुक्तिमुक्तीस कारण । हरीचे जन्मकर्म गुण ॥१॥

हरिकीर्तनाची जोडी । सकळ साधनें होतीं बापुडीं ॥२॥

शिळा तारिल्या सागरीं । गोवर्धन उचलिला करीं ॥३॥

निमाला गुरुपुत्र आणिला । मुखें दावाग्नी प्राशिला ॥४॥

तो सांवळां श्रीहरी । एका जनार्दनीं चरण धरी ॥५॥

२०२२

पतितपावन नाम श्रीविठ्ठलाचें । आणिक मी साचें नेणें कांहीं ॥१॥

पतितपावन नाम वाणी । विठ्ठलांवांचुनी कांहीं नेणें ॥२॥

पतीतपवान नामें तारिली गणिका । अजामेळ देखा सरता केला ॥३॥

पतितपावन नाम जनीं वनीं । एका जनार्दनीं नाम वाचे ॥४॥

२०२३

आम्हांसे तो पुरे विठ्ठलाची एक । वाउगाची देखा दुजा न मनीं ॥१॥

ध्यानीं धरुं विठ्ठल करुं तयाचें कीर्तन । आणिक चिंतन नाहीं दुजें ॥२॥

ध्येय ध्याता ध्यान खुंटला पैं शब्द विठ्ठ्ल उद्धबोध सुख आम्हां ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठल भरला । रिता ठाव उरला कोठें सांगा ॥४॥

२०२४

भीवरेचे तीरीं उभा । धन्य शोभा विठ्ठल ॥१॥

विटेवरी समचरण । तेथें मन गुंतलें ॥२॥

संत जाती तया ठाया । मजहि गांवा त्वां न्यावें ॥३॥

उपकार करा साचा । दाखवा दीनाचा सोयरा ॥४॥

एका जनार्दनीं बापमाय । वंदू पाय तयाचें ॥५॥

२०२५

घटघवीत वैकुंठनाथ । भक्तवत्सल शोभत ॥१॥

तयाचे पायीं माझें मन । राहो वृत्तिसह जडोन ॥२॥

नेणें आणिक दुजा छंद । वाचें आठवीन गोविंद ॥३॥

एका जनार्दनीं कटीं कर । उभा चंद्रभागे तीर ॥४॥

२०२६

सायासाचा श्रम न करुं पसारा । विठ्ठलाची बरा वाचे गातां ॥१॥

गोडपणें मिठी पडलीसे जीवां । कायामनें हेवा दुजा नाहीं ॥२॥

या विठ्ठलापारतें न करीं साधन । देखेन समचरण विटेवरी ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठलाची भेटी । सरलीसे तुटी गर्भवास ॥४॥

२०२७

मागें एक पुढें एक । दोन्हीं मिळोनि विठ्ठल देख ॥१॥

ऐसा होतांची मिळाणी । दिलें संसारासी पाणी ॥२॥

एक एक पाहतां दिठी । होय विठ्ठलेसी भेटी ॥३॥

एका सांडुनि दुजा नाहीं । एका जनार्दनीं ध्याई ॥४॥

२०२८

आम्हां नादीं विठ्ठलु छंदीं विठ्ठलु । हृत्पदी विठठलु मिळतसे ॥१॥

आम्हां धातुं विठ्ठलु मातु विठ्ठलु । गातुं विठ्ठलु आनंदें ॥२॥

आम्हां राग विठ्ठलु रंग विठ्ठलु । संग विठ्ठलु वैष्णवांचा ॥३॥

आम्हां ताल विठ्ठलु मेळ विठ्ठलु । कल्लोळ विठ्ठलु कीर्तनें ॥४॥

आम्हां श्रुति विठ्ठलु श्रोता विठ्ठलु । वक्ता विठ्ठलु वदनीं ॥५॥

आम्हां मनीं विठ्ठलु ध्यानीं विठ्ठलु । एका जनार्दनीं अवघा विठ्ठलु ॥६॥

२०२९

ध्येय ध्याता ध्यान विठ्ठल संपुर्न । ज्ञेय ज्ञाता पुर्ण विठ्ठल माझा ॥१॥

योगयाग तप विठ्ठलनाम जप । पुण्य आणि पाप विठ्ठल बोला ॥२॥

उन्मनी समाधी विठ्ठल बोला वाणी । तारील निर्वाणीं विठ्ठल माझा ॥३॥

मज भरंवसा कायामनेंवाचा । एक जनार्दनीं त्याचा शरणांगत ॥४॥

२०३०

एक विठ्ठल वदतां वाचे । आणिक साचें नावडती ॥१॥

बैसलासे ध्यानीं मनीं । विठ्ठलावांचुनीं दुजें नेणें ॥२॥

जावें तिकडे विठ्ठल भरला । रिता ठाव नाहीं उरला ॥३॥

एका जनार्दनीं भावें । विठ्ठल म्हणतां पाठी धांवें ॥४॥

२०३१

गातो एका ध्यातो एका । अंतरबाहीं पाहातों एका ॥१॥

अगुणां एक सगुणीं एका । गुणातीत पाहातो एका ॥२॥

जनीं एका वनीं एका । निरंजनीं देखो एका ॥३॥

संत जना पढिये एका । जनार्दनीं कडिये एक ॥४॥

२०३२

वादविवाद अतिवाद । नावडे कोणाचीही संमध ॥१॥

बोल एक आम्हां बोलणें । वाचे विठ्ठलुचि म्हणे ॥२॥

आणिकाची चाड चित्तीं । नाहीं नाहीं गा त्रिजगतीं ॥३॥

शरण एका जनार्दनीं । विठ्ठल भरलासे व्यापुनी ॥४॥

२०३३

एक विठ्ठलचिंतन । आणिक दुजें नेघे मन । ऐसें घडतां साधन । जोडे सर्व तयासी ॥१॥

हेचि एकविधा भक्ति । येणें जोडे सर्व मुक्ति । पर्वकळ विश्रांति । तेथें घेती सर्वदा ॥२॥

तीर्थ ओढवती माथा । वंदिताती सर्वथा । तपांच्या चळथा । घडताती आपेआप ॥३॥

घडतें यज्ञाचें पुण्य । आणिक तया नाहीं बंधन । शरण एका जनार्दन । निश्चय ऐसा जयाचा ॥४॥

२०३४

देव विठ्ठल तीर्थ विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥१॥

जन विठ्ठल वन विठ्ठल । जळीं स्थळीं विठ्ठल भरलासे ॥२॥

भाव विठ्ठल देव विठ्ठल । अवघा विठ्ठल भरलासे ॥३॥

एका जनार्दनीं मनीं विठ्ठल । जप तप ध्यान विठ्ठल ॥४॥

२०३५

एकपण पाहतां सृष्टी । भरली दृष्टी विठ्ठल ॥१॥

नाहें द्वैताची भावना । बैसला ध्याना विठ्ठल ॥२॥

मीतुंपणा वोस ठाव । बैसला सर्व विठ्ठल ॥३॥

ध्यानीं विठ्ठल मनीं विठ्ठल । एका जनार्दनीं अवघा विठ्ठल ॥४॥

२०३६

रिता ठाव न दिसें पाहतां । भरला पुरता विठ्ठल ॥१॥

जनीं वनीं विजनीं देखा । विठ्ठल सखा भरलासे ॥२॥

पाहतां पाहणें परतलें । विठ्ठलें व्यापिलेंक सर्वत्र ॥३॥

नाहीं पाहण्यासी ठाव । अवघा भाव विठ्ठल ॥४॥

एका जनादनीं व्यापक । विठ्ठल देख त्रिवभुनीं ॥५॥

२०३७

मागें पुढें विठ्ठल भरला । रिता ठाव नाहीं उरला ॥१॥

जिकडे पहावें तिकडे आहे । दिशाद्रुम भरला पाहे ॥२॥

एका जनार्दनीं सर्व देशीं । विठ्ठल व्यापक निश्चयेंशीं ॥३॥

२०३८

विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान । नाहीं आम्हां चिंतन दुजियांचे ॥१॥

आमुचे कुळींचे विठ्ठल दैवत । कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥

विठ्ठलावांचुनी नेणों क्रियाकर्म । विठठलावांचुनी धर्म दुजा नाहीं ॥३॥

एका जनार्दनीं विठ्ठल भरला । भरुनीं उरला पंढरीये ॥४॥

२०३९

उच्चार फुकाचा नाम हें विठ्ठल । नाहीं कांही मोल द्रव्य वेंचे ॥१॥

जागृती सुषुप्ती स्वप्नीं विठ्ठलनाम ध्यानी । गाऊं तें कीर्तनीं दिननिशीं ॥२॥

एका जनार्दनीं केला लागपाठ । तेणें सोपी वाट वैकुंठीची ॥३॥

२०४०

रूप तेंचि नाम नाम तेंचि रुप । अवघा संकल्प एकरुप ॥१॥

पहातां पहाणें हरपलें देहीं । देहचि विदेही होउनी ठेलों ॥२॥

सांगतां नवल पाहतां सखोल । बोलतां अबोल चोज वाटे ॥३॥

एका जनार्दनीं बोलण्या वेगळा । उभा तो सांवळा विटेवरी ॥४॥