गीत दासायन

गीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.


प्रसंग ४

'सावधान' हा शब्द कानी पडताच नारायण सावध झाला. त्याने मनाशी विचार केला, आईला दिलेल्या वचनातून आपण मुक्त झालो आहोत. आता सावध व्हायला हरकत नाही. असा विचार करून लग्नमंडपातून नारायण एकदम बाहेर पडला. मंडपात सर्वत्र हलकल्लोळ उडाला. 'अरे नवरा पळाला' असे जो तो एकमेकांना सांगू लागला. भटा-भिक्षुकांची एकच धांदल उडाली. राणूबाईंना काय करावे ते सुचेना. या अनपेक्षित प्रसंगाने त्या अत्यंत व्याकूळ झाल्या. नारायण जो पळाला तो गावाबाहेरील अश्वत्थाच्या झाडावर चढून बसला. राणूबाईंना हे समजताच काळजीने त्यांचे ह्रदय शतशः विदीर्ण झाले. श्रेष्ठांना बरोबर घेऊन त्या वृक्षापाशी आल्या. नारायण अगदी उंच जाऊन बसला होता. ते पाहून राणूबाईचे अंतःकरण घाबरून गेले. त्या सर्व मंडळींना विनवून सांगू लागल्या, "कुणीतरी झाडावर चढून माझ्या नारायणाला खाली आणा हो." पण नारायण इतक्या उंचावर जाऊन बसला होता, की तेथे चढून जाण्याचे धैर्य कुणालाच झाले नाही. शेवटी असह्य होऊन राणूबाई म्हणाल्या, "माझ्या जीविच्या जीवना, खालि येई नारायणा."

माझ्या जीविच्या जीवना

खालि येई नारायणा

नको अंत पाहू माझा

ओढ लागे पंचप्राणा ॥ध्रु०॥

मानिलेस तूही मजला

म्हणुनि मांडिला सोहला

नाहि ओळखीले तुजला

लाडक्या रे नारायणा ॥१॥

लग्न नव्हे आले विघ्न

मनोरथ झाले भग्न

रामनामि तू रे मग्न

राहि सदा नारायणा ॥२॥

आता नाहि रागावणार

मीच तुझे मानणार

आजवरी चुकले फार

राग सोडि नारायणा ॥३॥

तुझ्याविना कैशी राहू

ताटातूट कैसी साहू

नारायणा कोठे पाहू

सांग तूच नारायणा ॥४॥

तात तुझे सोडुनि गेले

दुःख तुला पाहुनि गिळले

तूहि जासि सोडुनि सगळे

साहु कशी नारायणा ॥५॥

तूच एक प्राणविसावा

बावरल्या माझ्या जीवा

का रे दैव साधी दावा

खालि येई नारायणा ॥६॥