गीत दासायन

गीत दासायन हे गीत रामायण प्रमाणेच मधुर काव्य आहे.


प्रसंग २

समर्थांच्या मातोश्रींचे नाव रेणुका असे होते. परंतु सर्वजण त्यांना राणूबाई असे म्हणत असत. लहानपणी नारायण राणूबाईंच्या बरोबर कथाकीर्तनाला आवडीने जात असे. बुद्धीने अतिशय हुशार परंतु मुलखाचा खट्याळ अशी नारायणाची ख्याती होती. एकदा नारायण हिंडता हिंडता एका शेतात गेला. तेथे जोंधळ्याची मळणी चालली होती. काही पोती भरून ठेवली होती. नारायणाने शेतकर्‍याला विचारले "यातले एक पोते घरी नेऊ का?" यावर शेतकरी विनोदाने म्हणाला, "तुला उचलत असेल तर ने." एवढे ऐकताच नारायणाने सहज लीलेने जोंधळ्याचे भरलेले पोते पाठीवर घेतले आणि मारुतीने द्रोणागिरी आणला त्या आवेशात ते पोते घरी आणून टाकले. शेतकरी पाठोपाठ पळत आला, आणि राणुबाईंना म्हणाला. "तुझ्या लेकाने माझे पोते पळविले. तेव्हा नारायण म्हणाला, "तुमचे पोते तुम्ही घरी घेऊन जा." शेतकर्‍याने पोते उचलले तो त्या जागी दुसरे पोते दिसू लागले. दुसरे उचलले तो तिसरे दिसू लागले. शेवटी शेतकरी दमला. त्याने राणूबाईंना साष्टांग नमस्कार घातला. हा प्रसंग पाहून राणूबाईंचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. त्यांनी नारायणाला जवळ घेतले आणि म्हणाल्या, "नारायणा ! आता तू मोठा झालास. अशा खोड्या करू नये." परंतु मनातून मात्र त्यांना असेच वाटत होते, "सानुला ग नारायण."

सानुला ग नारायण

काय सांगु त्याचे गुण

बोबड्या ग बोलाने हा

सांगे मला रामायण ॥ध्रु०॥

सानुले ग याचे ओठ

गोर्‍या भाळि शोभे तीट

नजर तिखट आणि धीट

आवरेना एक क्षण ॥१॥

सानुले धनुष्य बाण

हाति घेई नारायण

म्हणे वधिन मी रावण

आणि सोडी रामबाण ॥२॥

सानुला ग नारायण

मित्र याचे सारेजण

जमवि सर्व वानरगण

खोड्या याच्या विलक्षण ॥३॥

सानुला ग नारायण

आज होतसे ब्राह्मण

याच्या मुंजीसाठी जाण

गोळा झाले आप्तगण ॥४॥

सानुला ग नारायण

सुरू झाले अध्ययन

तोष पावले गुरुजन

पाहुनिया याचे ज्ञान ॥५॥

संपले ग बालपण

थोर झाला नारायण

करूनिया त्याचे लग्न

होउ सर्व सुखी जाण ॥६॥